Pimpri News: महापालिकेच्या शाळांतील मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी ‘शिक्षक मित्रांची फौज’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतील गुणवत्तावाढीसाठी निवडक शिक्षकांना एकत्र करत ‘शिक्षक मित्रांची फौज’ तयार करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी दिली.

महापालिकेचे शिक्षक आणि प्रशासन यांच्यात दुवा म्हणून शिक्षक मित्र काम करणार आहेत. या शिक्षक मित्रांची निवड महापालिकेच्या शिक्षकांमधूनच होणार आहे. यासाठी शिक्षकांकरिता खास गुगल फॉर्म तयार करण्यात आला. त्यात शिक्षकांची वैयक्तिक माहिती, त्यांनी आजवर शाळेत राबवलेले उपक्रम, शिक्षक म्हणून झालेली सेवा आदींची माहिती घेण्यात आली आहे. या प्रत्येक शिक्षकांची मुलाखत आणि परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर निवडलेले शिक्षक मित्र म्हणून काम पाहतील.

या शिक्षक मित्रांची निवड ही दोन प्रक्रीयांमधून होईल. यात पहिल्या टप्प्यात या शिक्षकांची लेखी परिक्षा घेतली जाईल. यामध्ये पहिली ते आठवी संलग्न अभ्यासक्रम असेल. त्यातून निवडलेल्या शिक्षक मित्रांची तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. या दोन टप्प्यांतून निवड झालेले शिक्षक मित्र म्हणून निवडले जातील. पुढील काळाते या निवडलेल्या शिक्षक मित्रांची शिक्षक मित्र फौज तयार करुन शाळास्तरावर गुणवत्ता वाढीसाठी सहाय्य होणार आहे. शिक्षक आणि प्रशासनातील दुवा आणि दोन्ही स्तरावर सकारात्मक कार्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल.

शाळांची गुणवत्ता वाढ व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्याचे ठरवले. सध्या गुगल फॉर्म भरुन घेतले असून पुढची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करत शिक्षक मित्र म्हणून नियुक्ती केली जाईल. यासाठी विशेष मुलाखत घेऊनच शिक्षक मित्रांची भरती होणार आहे असल्याचे प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.