Pimpri News : सायबर हल्ला प्रकरणात टेक महिंद्रा कंपनीचा ‘यू-टर्न’

पाच कोटींचे नुकसान झाले नसल्याचा कंपनीचा दावा; आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे कबुली

एमपीसी न्यूज – सायबर हल्ल्याबाबत आम्ही पोलिसांत तक्रार दिली होती आणि त्यात 5 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दिला होता. पण, प्रत्यक्षात त्यावेळी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे मिळून निश्चित किती नुकसान झाले त्याची माहिती नव्हती. पोलीस तक्रारीत 5 कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज दिला होता. पण, नुकसान किती झाले याचा निश्चित तपास केला असता तो फक्त 27 सर्व्हरवर परिणाम झाल्याचा खुलासा टेक महिंद्रा कंपनीने केला आहे.

सायबर हल्ला प्रकरणात 5 कोटी रुपयांचे नुकसान झाले नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे नुकसान झाले नसल्याची कबुली कंपनीने दिली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची घटना अडीच महिन्यापूर्वी उघडकीस आली. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हरमधून डेटा इनक्रिप्ट करण्यात आला होता आणि तो हवा असल्यास बिटकॉइनची मागणी हॅकर्सने केली होती.

या सायबर हल्ल्यात सुमारे 5 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा महापालिकेच्या वतीने काम पाहणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीने पोलीस तक्रारीत केला होता. या एकूण प्रकरणात सायबर हल्ल्याच्या निमित्ताने 5 कोटी रुपयांचा विमा लाटण्याचा डाव असल्याचा संशय नगरसेविका सीमा सावळे यांनी व्यक्त केला होता. सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांच्यासह विविध नेत्यांनी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.