Pimpri news: धक्कादायक! कोरोनाचा रिपोर्ट येण्यास दहा दिवसांचा विलंब; रुग्णाचा मृत्यू

मृत्यूनंतर प्रशासन म्हणतंय रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, रुग्णाला घ्यायला येऊ का?

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन किती गलथान कामकाज करत आहे याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. पालिका प्रशासन अक्षरशः रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे.

रुपीनगर तळवडे येथील रहिवासी कमल पांडुरंग धुकटे (वय 59) यांनी  1 सप्टेंबर रोजी पालिकेच्या यमुनानगर येथील रुग्णालयात अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केली. अँटीजेनचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडले. दहा दिवसांनंतरही आरटीपीसीआरचा रिपोर्ट आला नाही. त्रास होऊ लागल्याने त्यांना बुधवारी (दि. 9) वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. तरी देखील त्यांचे रिपोर्ट आले नव्हते. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह की पॉझिटिव्ह माहिती नसताना उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 11) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती कमल पांडुरंग धुकटे यांचा मुलगा स्वप्नील धुपटे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना दिली.

यामध्ये रिपोर्ट यायच्या अधीच रुग्णाचा मृत्यू झाला असताना त्यावर कहर करत प्रशासनाने आज रुग्णाच्या नातेवाईकांना फोन करत तुमचा रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णवाहिका घेऊन रुग्णाला घ्यायला येऊ का अशी विचारणा करत कळस केला आहे. यातून प्रशासनात समन्वयाचा किती अभाव आहे, हे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्या 60 हजारच्या पुढे गेली आहे. कोरोना बळींची संख्यादेखील एक हजाराच्या पुढे गेली आहे. दिवसाला 20 हून अधिक जणांचा बळी जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. नागरिकांना पाच-पाच दिवस रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे देखील सांगितले जात नाही. रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे हे माहिती होत नाही. रुग्ण घरीच राहिल्याने त्यांचे मृत्यू होत आहेत.

कोरोनाचे रिपोर्ट दहा दिवसानंतरही आले नव्हते. आईचा काल मृत्यू झाला. त्यानंतर 24 तासाने रिपोर्ट आले आहेत. काल मृत्यू झाला असताना आज पालिका प्रशासनाकडून फोन आला की तुमच्या आईचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना घ्यायला येऊ का? किती हलगर्जीपणा केला जात आहे. मृत्यू झाल्यानंतर रिपोर्ट येत आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा संताप कमल यांचा मुलगा स्वप्नील धुपटे यांनी व्यक्त केला. तसेच वडिलांचे वय जास्त आहे. त्यांचा रिपोर्ट देखील आजूनही आली नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी काही माहिती नसल्याचे सांगत माहिती घेऊन बोलतो असे उत्तर दिले.

रूपीनगरचे मनीष भालेकर म्हणाले, आरटीपीसीआरचे रिपोर्ट सात ते दहा दिवस येत नाहीत. रिपोर्ट येईपर्यंत नागरीक बाहेर फिरतात. त्यामुळे त्यांच्याकडून कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ शकतो. 1 सप्टेंबर रोजीच माझ्या भावाची देखील चाचणी करण्यात आली. अद्यापही त्याचे रिपोर्ट आले नाहीत.  पालिकेकडून एखादा निगेटिव्ह आल्यानंतर सांगितले देखील जात नाही. पालिकेने रिपोर्ट निगेटिव्ह आला. तरी संबधितांना सांगणे गरजेचे आहे.

पालिका अँटीजेन चाचणीचे देखील रिपोर्ट दुसऱ्या दिवशी देतो. आरटीपीसीआरचे रिपोर्ट येण्यास सात ते आठ दिवस लागतात. तोपर्यंत काहीजण घरी राहतात. तर, काहीजण बाहेर फिरतात. रिपोर्ट येण्यास वेळ खूप लागत आहे. या प्रक्रियेत दहा ते बारा दिवस जातात.  त्यामुळे रुग्ण गंभीर होतो. त्यातच त्याचा मृत्यू होतो. त्यामुळेच शहरातील मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, रिपोर्ट येण्याअगोदर रुग्णाचा मृत्यू होतो आणि दुसऱ्या दिवशी पालिकेकडून रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जाते. पालिकेच्या गलथान कारभाराचा हा मोठा नमुना आहे.

तसेच, पालिका अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. शोबाजी करत आहेत. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. नियोजन नावाचा प्रकार नाही. विस्कळीत, ढिसाळ कारभार आहे. सगळा सावळ-गोंधळ सुरू आहे. पदाधिकाऱ्यांचे लक्ष केवळ खरेदीवर आहे. नागरिकांकडे कोणाचे लक्ष नाही. पिंपरी-चिंचवडकर राम भरोसे झाले आहेत की काय असा प्रश्न पडला असल्याचे भापकर म्हणाले. योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. रुग्णसंख्या, मृत्यू वाढत आहेत. त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पहावे. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.