Pimpri News: ‘ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून ऑक्सीजन गॅस पाईपलाईनची निविदा’

नगरसेवकांकडून होतोय आरोप, निविदा रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार रुग्णालयांकरिता गॅस पाईपलाईनची निविदा एका ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आली आहे. यामध्ये मोठी अनियमितता झाल्याचे आरोप करत ही निविदा तत्काळ रद्द करण्याची मागणी लोकप्रतिनीधींकडून केली जात आहे.

महापालिकेच्या जिजामाता रुग्णालय, भोसरी नवीन रुग्णालय, थेरगाव हॉस्पिटल आणि आकुर्डी हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन गॅस पाईपलाईनच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. 26 कोटी रुपयांची एक निविदा प्रसिद्ध केली आहे.

पुण्यातील एका कंपनीला डोळ्यासमोर ठेवून महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. पुण्यातील Atlas Copco कंपनीला डोळ्यासमोर ठेवून अटी-शर्ती निविदेत टाकल्याचा आरोप केला जात आहे.

एकाच ठेकेदाराला काम दिल्याने कामाला विलंब होवू शकतो. त्यामुळे स्वतंत्र चार निविदा काढणे आवश्यक आहे. एका कंपनीच्या भल्यासाठी 26 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केल्याचा आरोप होत आहे.

चार निविदा काढल्यावर स्पर्धा होईल. काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल. एका निविदेमुळे खर्च देखील वाढतो. लॉकडाउनमध्ये उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीत मध्यम उद्योगांना काम देण्याचे धोरण असताना महापालिकेकडून त्याला हरताळ फासला जात आहे.

निविदा प्रक्रियेत भाग घेणाऱ्या निविदाधारकांचा अनुभव, आर्थिक उलाढाल लक्षात घेण्याऐवजी उत्पादित कंपनीची आर्थिक उलाढाल व अशा प्रकारच्या कामाचा अनुभव मागवण्यात आला आहे.

याचा अर्थ ज्या निविदाधारकांकडे निविदेतील नमूद करण्यात आलेल्या कामाचा अनुभव नसताना त्यांना निविदेत पात्र करून तांत्रिक बाबींचा आधार घेऊन अनुभवी निविदाधारकांना अपात्र ठरवून एकाच कंपनीचे Authorization 3-4 निविदाधारकाच्या नावे घेऊन फिरवून सिंगल टेंडर करण्यासाठी हा सर्व प्रपंच करण्यात आलेला दिसून येत आहे.

प्री-बीड (निविदा पूर्व) बैठकीत या निविदेतील त्रुटी लक्षात आणून दिल्या आहेत. निविदेतील अनियमितता, ठराविक पुरवठादाराला डोळ्यासमोर ठेऊन त्यांना अनुकूल टाकलेल्या अटी-शर्ती शर्तीवर बाहेरून आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींनी हरकत घेतली आहे.

त्याकडेही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. ही निविदा रद्द तत्काळ करावी आणि पारदर्शकपणे फेरनिविदा प्रसिद्ध करावी, अशी मागणी होत आहे.

याबाबत बोलताना भांडार विभागाचे उपायुक्त मंगेश चितळे म्हणाले, ”कोणालाही ग्रहित धरुन निविदा काढली नाही. कोणतीही चुकीची गोष्ट केलेली नाही. नियमानुसार कार्यवाही केली जात आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.