Pimpri News : मंदिरातील वस्त्रसंहिता ही नग्नतेशी नव्हे, तर धर्मशास्त्राशी संबंधित – हिंदु जनजागृती समिती

एमपीसी न्यूज – साई भक्तांच्या मागणीनंतर आता साई दर्शनाला‌ जाताना भारतीय पेहरावात या असं आवाहन साईबाबा संस्थानने भाविकांना केल आहे. तसेच, तशी सूचना करणारे फलक देखील साई संस्थानने मंदिर परिसर व प्रवेशद्वारावर लावले आहेत. संस्थानाच्या या निर्णयाला काही जणांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान, मंदिरातील वस्त्रसंहिता ही नग्नतेशी नव्हे, तर धर्मशास्त्राशी संबंधित असल्याचे हिंदु जनजागृती समितीने म्हंटले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी याबाबत एक पत्रक काढले आहे. या पत्रकात ते असे म्हणातात की, शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात लागू करण्यात आलेली वस्त्रसंहिता ही नग्नतेशी संबंधित नसून ती धर्मशास्त्रांशी संबंधित आहे. केवळ मंदिरच नव्हे, विविध क्षेत्रांमध्ये वस्त्रे कोणती घालावीत, याचे काही नियम ठरलेले आहेत. त्या ठिकाणी ‘असेच वस्त्र का ?’, असे कोणी विचारत नाही. मात्र, हिंदु देवस्थानांनी असे आवाहन केले की, लगेच अन्याय झाल्याची अभ्यासहीन ओरड केली जाते. मंदिरात श्रद्धेने येणारे भक्त आणि धर्मपरंपरा यांचे पालन करणारे भाविक या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत याचे आनंदाने पालन आणि स्वागत करतील, असे घनवट यांनी म्हटले आहे.

घनवट पत्रकात पुढे असे म्हणतात, ‘मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात, अशी अत्यंत अभ्यासहीन टीका करणारे संस्थानाने काय आवाहन केले आहे, हे नीट वाचत नाहीत. संस्थानाने कुठेही तोकडे कपड्यांचा उल्लेख केला नाही, पुरूष-महिला असा उल्लेख केला नाही. तरी, अनेक दिवस प्रसिद्धी न मिळाल्याने केलेला हा ‘पब्लिसिटी स्टंट’ आहे. संस्थानने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. सोवळे-उपरणे घालणार्‍या पुजार्‍यांना अर्धनग्न म्हणणे, ही बौद्धिक दिवाळखोरी असल्याचे घनवट यांनी म्हंटलय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.