Pimpri news: निवृत्त झालेल्या ड्रायव्हर काकांसाठी अतिरिक्त आयुक्त स्वत: बनले ड्रायव्हर!

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांनी 35 वर्षे सेवेत असलेल्या ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला. ड्रायव्हर म्हणून 35 वर्ष सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या दिवशी निरोपासाठी खुद्द अतिरिक्त आयुक्त ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि आपल्या ड्रायव्हरचं सारथ्य केले. अतिरिक्त आयुक्त तुपे गाडी चालवत आहेत आणि त्यांचे ड्रायव्हर दत्तात्रय गाजरे ऐटीत मागे बसलेत, असं चित्र  महापालिकेत पाहायला मिळालं.

बुधवारचा दिवस गाजरे यांच्या आयुष्यत अतिशय महत्वाचा ठरला. आनंद, दुखः आणि सन्मान अन अभिमानाचाही.. 35 वर्ष महापालिकेत वाहनचालक म्हणून सेवा देऊन सेवानिवृत्त झाले. गाजरे यांच्या सेवानिवृत्तीचं हटके सेलिब्रेशन करण्याचं अतिरिक्त आयुक्तांनी ठरवलं. त्यांनी स्वत: गाजरे यांचं सारथ्य करण्याचा निर्णय घेतला. पालिकेच्या कार्यालयापासून ते गाजरे यांच्या निवास स्थानापर्यंत ते स्वतः चालक झाले आणि दत्तात्रय यांना आपल्या जागेवर बसविले.
यावेळी झालेल्या सेवानिवृत्ती समारंभात महापौरांनी त्यांना सन्मानित केलं.

आयुष्यभर आपल्या साहेबांना इच्छितस्थळी सुखरुप पोहोचविणारे दत्तात्रय गाजरे हे अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या या सन्मानाने गहिवरून गेले आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केल्यामुळं सध्या अतिरिक्त आयुक्त तुपे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.