Pimpri News : शेतकऱ्यांच्या अस्मितेपेक्षा तिरंग्याची अस्मिता मोठी – डॉ. श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांच्या अस्मितेपेक्षाही तिरंग्याची अस्मिता मोठी आहे. शेतकऱ्यांविषयी खोटा कळवळा दाखवणारे राजकारणी आणि साहित्यिक खूप आहेत. मात्र, यशवंतराव चव्हाण यांची सांस्कृतिक भूमिका सर्वस्पर्शी होती, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभाग आणि लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंत-वेणू गौरव सोहळ्यातील अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सबनीस बोलत होते. भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात गुरुवारी (दि.28) हा कार्यक्रम पार पडला.

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, लायन्स इंटरनॅशनल (डी3234 डी2) प्रांतपाल अभय शास्त्री, सोहळ्याचे स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभाग कार्याध्यक्ष रंगनाथ गोडगे-पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे आदी उपस्थित होते.

सबनिस पुढे म्हणाले, आज मंत्र्यांच्या बायकांचे फार्महाऊस आहेत. या तुलनेत मौन समर्पण करणाऱ्या वेणूताई या एकनिष्ठ गृहिणी अन् योगिनी होत्या. ठाले दांपत्य हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला समर्पित झालेले आहे.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले- पाटील व त्यांच्या पत्नी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा ठाले-पाटील या दांपत्याला डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी.पाटील यांच्या हस्ते यशवंत-वेणू सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

तर जुन्नर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते महेश शेळके यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय धावपटू संपदा केंदळे यांना वेणूताई चव्हाण युवती पुरस्कार आणि अहमदनगरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे यांना यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तत्पूर्वी वृक्षपूजनाने आणि कवी नितीन देशमुख यांच्या ‘यशवंतराव’ या कवितेच्या राजेंद्र वाघ यांनी केलेल्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना कौतिकराव ठाले-पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याच्या वेगवेगळ्या पैलूंची माहिती देत कृतज्ञता व्यक्त केली. अनुराधा ठाले-पाटील यांनी आपल्या ‘जन्माचा कर्जदार मी!’ आणि ‘ती पान लावते!’ या दोन कवितांचे सादरीकरण केले.

डॉ. रामचंद्र देखणे यांनी आपल्या मनोगतातून यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. डॉ. अनू गायकवाड, बाजीराव सातपुते, सुरेश कंक, मुकुंद आवटे, जयवंत भोसले, संगीता झिंजुरके, अरुण गराडे, प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाच्या संयोजन केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभाग अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. लायन्स क्लब भोजापूर गोल्डचे अध्यक्ष अरुण इंगळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.