Pimpri News: कोरोना काळात बेरोजगार झालेल्यांची माहिती केंद्र सरकारकडे नाही

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या अतारांकित प्रश्नाला राज्यमंत्री रामेश्वर तेली यांचे उत्तर

एमपीसी न्यूज  – कोरोना महामारीत देशातील किती नागरिक बेरोजगार झाले, याची माहिती केंद्र सरकारकडे उपलब्ध नाही. त्याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे लेखी उत्तर श्रम, रोजगार खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिले. याबाबत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अतारांकित प्रश्न विचारला होता.

कोरोना कालावाधीत देशातील किती नागरिक बेरोजगार झाले याबाबतची आकडेवारी तसेच खासगी, सरकारी क्षेत्रातील बेरोजगार नागरिकांची माहिती मिळण्याबाबत सरकारकडे काय यंत्रणा आहे का, याबाबत खासदार बारणे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला श्रम, रोजगार खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लेखी उत्तर दिले.

तेली यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार रोजगार, बेरोजगार यांच्याशी संबंधित राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी आणि कार्यान्वयन मंत्रालय यांच्याद्वारे आवधिक श्रम बल सर्वेक्षण (पीएलएफएस) यांच्या माध्यमातून सर्वे केला जातो. या सर्वेक्षणातून 2017-18 आर्थिक वर्षे ते  2020 पर्यंतची सामान्य आकडेवारी संकलीत करण्यात आली आहे. मात्र, मार्च 2020 नंतर कोरोना कालावधीत बेरोजगार झालेल्यांची आकडेवारी सरकारने लेखी उत्तरात दिली नाही. त्यामुळे कोरोना काळात किती जण बेरोजगार झाले. याची माहिती सरकारकडे उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात 2019-20 मध्ये सर्वाधिक 72.2 टक्के कामगार दादर आणि नगर हवेलीत आहेत. तर, सर्वात कमी म्हणजेच 39.7 टक्के कामगार बिहारमध्ये आहेत. महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात 2018-19 मध्ये 50.6 टक्के तर 2019-20 मध्ये 55.7 टक्के कामगार असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.