Pimpri News: स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलले; रवी लांडगे यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलल्याने नाराज झालेल्या भाजपच्या रवी लांडगे यांनी राजीनामा दिला आहे. लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिला आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपकडून नितीन लांडगे, रवी लांडगे, शत्रुघ्न काटे तीव्र इच्छुक होते. त्यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली होती. सभापतीपदाचे नाव अंतिम करण्यावर भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. अखेरच्याक्षणी नितीन लांडगे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज (मंगळवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे होते. भाजपकडून नितीन लांडगे यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

रवी लांडगे बिनविरोध निवडून आले आहेत. निष्ठावान असल्याने पद मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु, पक्षाने डावलले. त्यानंतर नाराज झालेले रवी लांडगे महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

निष्ठावान असून आपल्याला डावलले असून योग्यवेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे लांडगे यांनी राजीनाम्यानंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.