Pimpri news: आयुक्तांनी ‘स्पर्श’चा अहवाल दडविला; नगरसेवकांकडून महासभेत आयुक्तांचा धिक्कार

एमपीसी न्यूज – कोविड केअर सेंटरमध्ये एकाही रुग्णांवर उपचार केले नसताना पाच कोटी रुपयांची बिले महापालिकेला सादर करणाऱ्या ‘स्पर्श’ संस्थेच्या चौकशीचा अहवाल आयुक्तांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला नाही. महापौरांनी 10 दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला असतानाही आयुक्तांनी महापौरांच्या आदेशाची कोणाच्या आदेशावरून पायमल्ली केली ?. आयुक्तांनी महापौरांचा आदेश डावलून संविधानाचा अनादर केला. आयुक्तांनी ‘स्पर्श’चा अहवाल का दडविला, असा सवाल करत नगरसेवकांनी आयुक्तांचा धिक्कार केला.

दरम्यान, अहवालाला उशीर झाल्याने दिलगीरी व्यक्त करत चौकशी चालू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची विशेष सभा महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.30) पार पडली. स्पर्श हॉस्पिटलच्या भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्समधील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसताना चुकीच्या पद्धतीने पाच कोटी 14 लाख रुपयांची खोटी बिले सादर केल्याचा धक्कादायक प्रकार महापालिका लिपिकाच्या टिप्पणीमुळे उघडकीस आला होता. त्यात भ्रष्टाचार झाल्याचे मोठे आरोप झाले.

यावर महासभेत घमासान चर्चा झाली होती. त्यावर महापौर उषा ढोरे यांनी 9 मार्च 2021 रोजीच्या सभेत स्पर्शची चौकशी करुन दहा दिवसात अहवाल सभागृहासमोर ठेवण्याचा आदेश आयुक्तांना दिला होता. परंतु, पावणे दोन महिने होत आले तरी आयुक्तांनी अहवाल सभागृहासमोर ठेवला नाही.त्यावरुन नगरसेवकांनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले.

भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, “एकाही रुग्णावर उपचार केले नसताना स्पर्शने महापालिकेला 5 कोटी 14 लाख रुपयांची बिलं दिली. एकाही रुग्णांवर उपचार न करता पालिकेने स्पर्शला सव्वा तीन कोटी रुपये दिले. त्याच्या चौकशीचे काय झाले. अहवालाचे काय झाले. मागची बिले कोणाच्या खात्यातून गेली हे कळले पाहिजे”. “स्पर्शचा अहवाल सादर का केला नाही. पटलावर का मांडला नाही”, असा सवाल राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी उपस्थित केला.

“आयुक्तांनी आम्हाला मुर्ख समजून स्पर्शच्या चौकशीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला नाही. आयुक्तांनी महापौरांच्या आदेशाची कोणाच्या आदेशावरून पायमल्ली केली. आयुक्तांनी महापौरांचा आदेश डावलून संविधानाचा अनादर केला. त्यांचा मी धिक्कार करते. इमानदार अधिकारी असल्याचे कृतीतून दिसले पाहिजे. आयुक्त कोणाला भेटतात आणि कोणाला नाही हे संशायस्पद आहे”, असे भाजपच्या सीमा सावळे म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे योगेश बहल म्हणाले, “मी दोन महिन्यांपासून स्पर्शचे चुकीचे काम बाहेर काढत आहे. त्यावर आवाज उठवत आहे. आयुक्तांनी अहवाल का सादर केला नाही. स्पर्शला चुकीच्या पद्धतीने बिले दिली आहेत. त्याबाबत सात पत्रे दिली. स्पर्शवर गंभीर आरोप आहेत. त्यांना काम देवू नका, असे सांगितले. पण त्याची दखल घेतली नाही. पुन्हा स्पर्शला काम दिले. स्पर्शच्या प्रकरणात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि काही अधिकारी निलंबित होणार आहेत. ते निलंबित झाले नाहीतर मी सभागृहात पाऊल ठेवणार नाही”.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, “आदेश दिल्यानंतर आयुक्तांनी पळवाट काढली. शिक्षा झाली नाही, हे माझ्या लक्षात आहे”.

त्यावर खुलासा करताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “स्पर्श संस्थेच्या बिलाबाबत विविध आक्षेप होते. त्यात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचे नाव होते. ते वरिष्ठ अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिका-यांकडून चौकशी करणे आवश्यक होते. त्यासाठी विभागीय आयुक्तांना वरिष्ठ अधिकारी देण्याची विनंती केली. त्यांनी वरिष्ठ सनदी अधिका-यांसह तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असल्याने मी त्यावर जास्त भाष्य करणे योग्य नाही. त्यातील चौकशी करणा-या एका अधिका-याला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे उशीर झाला. त्याबाबत मी दिलगीरी व्यक्त करतो. चौकशी समितीला लवकर चौकशी पूर्ण करण्याची विनंती केली जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.