Pune News: कोरोनाचे संकट संपलेले नाही, शिवजयंती उत्सवात सुरक्षिततेची काळजी घ्या – अजित पवार

एमपीसी न्यूज – राज्यावरील कोरोनाचे संकट (Corona crisis) अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy cm Ajit Pawar) यांनी आज (शुक्रवारी) केले.

व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते. खा‌सदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, गेल्यावर्षी मार्चपासून कोरोनाचे संकट आले. त्यामुळे या काळात आलेले सर्व धर्मांचे सण, उत्सव साधेपणाने साजरे केले गेले. यंदा 19 फेब्रुवारी रोजी असणारी शिवजयंती आपण उत्साहात, सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरी करू.

शासनाच्या आवाहनाला जनतेने नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याही वेळेस तसा प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर राज्याचे प्रमुख अभिवादनासाठी येण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दिवशी अभिवादनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील, अशी दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जेथे पुरातत्व विभाग, वन विभागाच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे तेथे परवानग्या घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.