Pimpri news: पालिका करणार दहा हजार सोलापुरी चादर, बेडशीटची खरेदी; 80 लाखाचा खर्च होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण कक्षातील रूग्णांसाठी दहा हजार सोलापुरी चादर आणि बेडशीट खरेदी करण्यात येणार आहेत. राज्य हातमाग सहकारी महासंघाकडून हे साहित्य घेण्यात येणार असून त्यासाठी 80 लाख 61 हजार रूपये खर्च होणार आहे.

पिंपरी – चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना बाधीत आणि संशयित रूग्णांपासून रोगाचा प्रसार थांबविणे आणि त्वरीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोरोना बाधीत आणि संशयित रूग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते.

महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रूग्णालय व नवीन भोसरी रूग्णालयाच्या इमारतीमध्ये कोरोना बाधीत रूग्णांचे कक्ष आहेत.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार शहरात 11 ठिकाणी कोरोना केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. येथील व्यक्ती आणि रूग्णांसाठी 2500 सोलापुरी चादर आणि बेडशीट थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहेत.

त्यासाठी मुंबईतील महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ यांना 10 जून रोजी पुरवठा आदेश जारी करण्यात आला आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. खेड तालुक्यातील म्हाळूंगे इंगळे येथे नव्याने बांधलेल्या म्हाडाच्या इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर मधील रूग्णांसाठी मोठ्या किटच्या पाच हजार नगची मागणी केली आहे.

यामध्ये 14 दिवस देखरेखीखाली असणा-या रूग्णांसाठी उपलब्ध करून देत असलेल्या मोठ्या किट साहित्यामध्ये टुथब्रश, सॅनिटायझर, टॉवेल, अंगाचा साबण, कपड्याचा साबण, पाणी पिण्याचा ग्लास, चादर, बेडशीट, पाण्याचा जग, टिश्यू पेपर या साहित्याचा समावेश आहे.

फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत चिखली येथील घरकुल इमारतीमध्ये नव्याने कोरोना केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या किटमधील इतर साहित्य उपलब्ध होत आहे. त्यापैकी सोलापूरी चादर आणि बेडशीट यांचे प्रत्येकी दहा हजार नग खरेदी करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ यांनी सफेद रंगाच्या एका बेडशीटचा दर 429 रूपये 20 पैसे, तर एका सोलापूरी चादरचा दर 376 रूपये 95 पैसे असा सादर केला आहे.

त्यानुसार, 10 हजार बेडशीटसाठी 42 लाख 92 हजार रूपये आणि 10 हजार सोलापूरी चादरीसाठी 37 लाख 69 हजार 500 रूपये असा एकूण 80 लाख 61 हजार 500 रूपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.