Pimpri News : आमदार कन्येच्या मांडव टहाळ्यातील नृत्य कनिष्ठ अभियंत्याला भोवले; आयुक्तांची सक्त ताकीद

एमपीसी न्यूज – भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या कन्येच्या लग्न मांडव टहाळे कार्यक्रमातील नृत्य पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला चांगलेच भोवले आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ‘त्या’ कनिष्ठ अभियंत्याला सक्त ताकीद दिली असून यापुढे गैरवर्तन केल्यास कडक शास्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सुनील सिद्धाप्पा बेळगावकर असे सक्त ताकीद दिलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांच्या कन्येचा मे महिन्यात विवाह झाला. लग्नाच्या मांडव टहाळे कार्यक्रमात महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर सहभागी होऊन नृत्य करत होते. कोरोनाच्या नियमांचे पालन न करता आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचा भंग करुन बेळगावकर नृत्य करत होते. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने बेळगावकर यांना नोटीस दिली होती. लग्नापूर्वीच्या विधीसाठी हजर असल्याचे मान्य करत मास्क न लावल्याने दंड वसूल केला असल्याचा खुलासा बेळगावकर यांनी केला. परंतु, शासकीय कर्मचा-यांनी नेहमीच सचोटीने वागणे, कर्तव्यपराणता ठेवणे, शासकीय कर्मचा-यास अशोभनीय ठरेल, अशी कोणतीही गोष्ट करता कामा नये. मात्र, कनिष्ठ अभियंता बेळगावकर यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 56 (1) आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीचा भंग केला आहे. त्यामुळे बेळगावकर यांना सक्त समज देण्यात आली आहे.

यापुढे अशा प्रकारचे गैरवर्तन घडणार नाही, याची त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी; अन्यथा यापेक्षा कडक शास्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.