Pimpri News: अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी रविवारी

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील 304 कनिष्ठ महाविद्यालयांतील एक लाख सहा हजार 972 जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

एमपीसी न्यूज – अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून विद्यार्थ्यांना आता नियमित पहिल्या प्रवेश फेरीच्या गुणवत्ता यादीसाठी रविवारपर्यंत (दि.30) प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील 304 कनिष्ठ महाविद्यालयांतील एक लाख सहा हजार 972 जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज केलेल्या 72 हजार 820 विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली होती.

विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी कालावधीही दिला होता. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेत जवळपास सहा हजार 190 विद्याथ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. तर, 63 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश रद्द केले आहेत.

शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार रविवारी (दि.30) नियमित प्रवेश फेरी एक अंतर्गत प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यात विद्यार्थ्याला त्याच्या लॉग इनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविले जाईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मोबाइल संदेश पाठविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.