Pimpri News: शिवरायांच्या विज्ञानवादी विचारांचा वारसा पुढे न्यावा – तात्यासाहेब मोरे

0

एमपीसी न्यूज – शिवरायांचे संघटनात्मक कौशल्य, अन्याय करणाऱ्यांविरुद्ध घेतलेली कठोर भूमिका, जिद्द, ध्येयासक्ती, विविध विषयांची जाण आणि लोकहितासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन स्वराज्याच्या प्रशासनाचे केलेले नियोजन अशा अनेक बाबी आपल्याला प्रोत्साहित आणि मार्गदर्शन करत असतात. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने संकल्पपूर्वक शिवरायांच्या विज्ञानवादी विचारांचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन शिवव्याख्याते तात्यासाहेब मोरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय ऑनलाईन विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तात्यासाहेब मोरे यांनी ‘शिवचरित्रातून काय शिकावे’ या विषयावर आपले विचार मांडले, त्यावेळी ते बोलत होते.

पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, क्रीडा कला साहित्य आणि सांस्कृतिक समितीचे सभापती उत्तम केंदळे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांनी केवळ लढाया केल्या, किल्ले जिंकले, युद्ध केले यापलीकडे जाऊन शिवराय कसे जगले हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे, असे नमूद करून मोरे म्हणाले, हा राजा जसा पराक्रमी होता तसा तो विचारवंत आणि आदर्श युगप्रवर्तक होता.

बलाढ्य शत्रूशी लढत असताना स्वकियांशी देखील लढणाऱ्या राजाने अन्यायकारक गोष्टींना कधी थारा दिला नाही. अन्याय होत असेल तिथे प्रहार करण्याचे काम शिवरायांनी केले. रयतेवर अन्याय करणाऱ्या जवळच्या सगेसोयरे यांना देखील त्यांनी शासन केले.

_MPC_DIR_MPU_II

शिवराय हे द्रष्टे होते. स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारा राजा म्हणून शिवराय सर्वांसाठी आदर्श आहेत. कधी घाव घालावा आणि कधी घाव सोसावा याची उत्तम जाण शिवरायांना होती. नैराश्याच्या गर्तेत जाऊन आपले आयुष्य संपवण्याचा विचार करणाऱ्यांनी शिवचरित्रातील पुरंदरचा तह वाचावा. कठीण प्रसंगाला कसे सामोरे जायचे याचे उत्तम उदाहरण आपल्याला या प्रसंगातून मिळते.

मुत्सद्दी राजकारणी असलेल्या शिवरायांनी सर्व घटकांना सोबत घेऊन लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण केले. आजची तरुण पिढी रचनात्मक कार्यापेक्षा विध्वंसक कार्याकडे जास्त वळलेली दिसते, हा समाजासाठी मोठा धोका आहे. आपले जीवन योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रत्येकाने शिवचरित्र अभ्यासून ते अंगीकारले पाहिजे, असे शिवव्याख्याते मोरे म्हणाले.

रामनाथ पोकळे म्हणाले, महापुरुषांच्या गुणांचा अंगीकार केल्यास आपले जीवन आदर्श बनण्यास मदत होईल. आजची नवीन पिढी ही कायद्याच्या चौकटीत राहून पुढे जाण्यापेक्षा बेकायदेशीर गोष्टींकडे वळण्याचा एक ट्रेंड सुरू झाला आहे. हा ट्रेंड समाजाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. त्यामुळे महापुरुषांचे जीवनकार्य नव्या पिढीसमोर मांडणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. छत्रपती शिवरायांचे चरित्र सजग आणि सुजाण सक्षम पिढी घडविण्यासाठी प्रभावी ठरणार आहे.

पक्षनेते नामदेव ढाके आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जीवन बोराडे यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

यानंतर शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाड्यांचा कार्यक्रम सादर केला. महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने विचार प्रबोधन पर्वाची सांगता करण्यात आली.

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे कलात्मक अविष्काराचा माध्यमातून सादरीकरण या कलाकारांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.