Pimpri news: रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या तुटवड्याकडे महापौरांनी वेधले उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून कोविड 19 संबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनच्या तुटवड्याकडे महापौर उषा ढोरे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले.

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन संदर्भातील बैठक पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) पार पडली.

यावेळी महापौर उषा ढोरे यांनी पिंपरी-चिंचवड शहराची कोरोना परिस्थितीची माहिती दिली. शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यामध्ये यश येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

_MPC_DIR_MPU_II

या बैठकीला कामगार व राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर , जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापौर माई ढोरे यांना कोरोनासंबंधी काय परिस्थिती आहे आणि तुम्ही कसे नियोजन केले आहे यासंबंधी विचारणा केली.

शहरासंबंधी माहिती देताना महापौर ढोरे म्हणाल्या की, महापालिकेच्या माध्यमातून कोविड 19 संबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनच्या तुटवडा जाणवत आहे.

कोविड 19 वर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु आहे. या अंतर्गत शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जाते आहे. यासाठी प्रत्येक प्रभागानुसार स्वयंसेवक घरांना भेटी देत असून नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.