Pimpri News: महापालिकेकडे उद्या दिवसभर पुरतील एवढेच कोरोना लसीचे डोस शिल्लक

फक्त 15 हजार लसीचे डोस शिल्लक; कोरोना लसीचा तुटवडा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आणखी एक संकट चालून आले आहे. शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर कोरोनावरील लशींचा तुटवडा जाणवू लागला आहे. महापालिकेकडे लसीचे फक्त 15 हजार डोस शिल्लक असून ते उद्या दिवसभरात संपतील. लसीअभावी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता असल्याने महापालिकेला लसीकरणही थांबवावे लागू शकते.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी , फ्रंटर वर्कर यांना लस देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे.

आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांपुढील सर्वांना लस दिली जात आहे. तेव्हापासून महापालिकेचे लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आजपर्यंत 2 लाख 20 हजार 853 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांबरोबर लसीकरणवरही भर दिला आहे. महापालिकेची 58 आणि खासगी 29 अशी 87 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. झोपडपट्टीतील नागरिकांना लसीकरण केंद्रावर घेवून जावून महापालिका लसीकरण करत आहे. दिवसाला 15 हजारहून अधिक नागरिकांना लस दिली जाते.

महापालिकेला लसीचा पुरवठा कमी होत आहे. महापालिकेकडे केवळ 15 हजार कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत. उद्या दिवसभरात हे डोस संपतील. परिणामी, लसीकरण थांबवावे लागू शकते.

 आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ”महापालिकेकडे 15 हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस शिल्लक आहेत. उद्या दिवसभर ते पुरतील. महापालिकेने लसीची मागणी केली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत लसीचे डोस मिळतील. महापालिकेने कितीही लसीची मागणी केली तरी ‘लॉट’मध्ये लस दिली जाते”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.