-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News : संभाव्य तिसरी लाट आणि लहान मुलांमधील कोरोना थोपविण्यासाठी ‘अशी’ आहे पालिकेची पूर्वतयारी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – देशात हाहा:कार माजवणा-या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली असून, याचा लहान मुलांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. पिंपरी चिंचवड पालिकेने संभाव्य तिसरी लाट आणि लहान मुलांमधील कोरोना थोपविण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीबाबत पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी माहिती दिली आहे.

कोरोना तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी या अनुषंगाने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय टास्क फोर्स सदस्य यांनी पत्रकारांशी आज (सोमवारी) दुपारी चार वाजता ऑनलाईन संवाद साधला.

1) टास्क फोर्सची स्थापना

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, विभागीय टास्क फोर्सच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना केली आहे. वायसीएम रूग्णालयाच्या बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. आंबिके यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून मिळणा-या वेगवेगळ्या माहीती आणि सूचना यांच्या अनुषंगाने नियोजन केले जात आहे. तसेच, शहरातील दवाखाने पालिकेशी जोडण्यात आले आहेत. तसेच, उपचारासाठी लागणारी साधनं, उपकरणं आणि यांची उपलब्धता आणि साठा याबाबत नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

2) लहान मुलांमध्ये जागरूकता आणि चाईल्ड हेल्पलाईन

कोरोना बाबत लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे राजेश पाटील यांनी नमूद केले. पाटील म्हणाले, मुलांमध्ये शाळेच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी शिक्षकांचे गट तयार करण्यात आले असून, मुलांसाठी व्हीडीओ आणि लिखित स्वरूपात साहित्य तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तसेच, मुलांच्या समस्या जाणून घेऊन माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन तयार केली असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये डॉक्टर देखील मार्गदर्शन करणार असून, ज्याठिकाणी वैद्यकीय मदतीची गरज असेल त्याठिकाणी डॉक्टर मार्गदर्शन करतील. येत्या आठवड्यात ही हेल्पलाईन सुरू होईल, असे राजेश पाटील यांनी सांगितले.

3) रूटींग इम्युनायझेशन (नियमित लसीकरण)

लहान मुलांना वेगवेगळ्या लसी दिल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे लसीकरण लांबणीवर पडले. आता पिंपरी चिंचवड पालिकेने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यामाध्यमातून बालकांचे नियमित लसीकरण उरकून घेतले जाणार असल्याचे पाटील म्हणाले.

4) सिरो सर्व्हे

संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका दहा हजार नागरिकांचा सिरो सर्व्हे करणार आहे. शहरातील किती लोकसंख्या कोरोना संक्रमित आहे, किती लोकांच्या अँटीबॉडीज तयार झाल्या याबाबत या सर्व्हेतून माहीती गोळा केली जाणार आहे. यासाठी सर्व वयोगटातील (18 वर्षाखालील देखील) नागरिकांचे नमुने गोळा केले जाणार असल्याची माहीती आयुक्त पाटील यांनी दिली.

5) पॅरामेडिकल स्किल ट्रेनिंग
लहान मुलांची कशी काळजी घ्यावी, औषध कशी द्यावीत याबाबत नर्सेस यांनी अधिक माहिती नसते. त्यामुळे पॅरामेडीकल स्टाफला प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित पॅरामेडीकल स्टाफ तयार करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे आयुक्त पाटील यांनी नमूद केले.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn