Pimpri News: पालिका राबविणार कुष्ठ, क्षय रुग्ण शोध अभियान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 1 ते 16 डिसेंबर 2020 दरम्यान कुष्ठ रुग्ण व क्षय रुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाकरिता येणा-या कर्मचारी, स्वयंसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

राज्यातील कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुगण व क्षय रुग्णांचे निदान आणि औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मागील अनेक वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. याबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या जात आहेत.

रोगशास्त्रीय अभ्यासानुसार दोन्ही आजारांचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगांपासून निर्माण होणा-या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे त्याच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना रोगाची लागण होण्याचा धोका संभवतो. संसर्गाची साखळी अखंडीत राहते.

समाजातील सर्व क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेवून निदान निश्चितीनंतर औषधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार 1 ते 16 डिसेंबर दरम्यान शोध अभियान राबविण्यात येणार आहे.

अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, वैद्यकीय अधिकारी अंजली ढोणे, वर्षा डांगे, कुष्ठरोग अधिकारी डॉ. साबळे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा कार्यकर्ती व मोहिमेअंतर्गत नियुक्त स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.