Pimpri News :आपल्या कवितेतून मोर नाचला पाहिजे – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज- प्रतिभेचं अंगण हे प्रतिभावंतांना आंदण मिळालेलं असतं. आपल्या कवितेतून मोर नाचला पाहिजे, अशी कवीची सुप्त इच्छा असते. साहित्यसाधना करीत असताना आपण स्वतः मोर झालं पाहिजे, ही जाणीव एक दिवस कवीला होते! असे काव्यात्मक प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् , चिंचवड येथे शनिवारी ( दि.24) केले.

दिलासा साहित्य सेवा संघ या व्हाॅट्सॲप समूहाने 10 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबर या कालावधीत ‘निसर्गचित्र काव्य’ हा साहित्यिक उपक्रम सलग पंचाहत्तर दिवस राबवून लॉकडाउनच्या काळात मानसिक दिलासा देण्याचे कार्य केले. या निमित्त उपक्रमाचे संयोजक कवयित्री वर्षा बालगोपाल, प्रदीप गांधलीकर आणि सुरेश कंक यांचा महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, सविता इंगळे, नंदकुमार मुरडे यांची उपस्थिती होती.

माणसाचे दु:ख समजून घेण्याची शक्ती निसर्गात असते म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात रमले पाहिजे. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून माणसांमधील सुप्त सर्जनशीलता वृद्धिंगत करता येते, असे या उपक्रमाने सिद्ध केले आहे!” असे विचार पुरुषोत्तम सदाफुले यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

या प्रसंगी दुर्गाष्टमीचे औचित्य साधून वर्षा बालगोपाल यांची साडीचोळी देऊन महिलांकडून ओटी भरण्यात आली; तर गांधलीकर आणि कंक यांना टोपी, पंचा, तुळशीचे रोप, पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून ज्ञान, मनोरंजन आणि सामाजिक भान जागृत व्हावे म्हणून विजयादशमीपासून प्रारंभ होणाऱ्या नवीन उपक्रमांचे मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन अनावरण करण्यात आले.

त्यामध्ये दर सोमवारी ‘लघुलेख मालिका’ (नंदकुमार मुरडे), मंगळवारी ‘साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आणि पुस्तके’ (प्रदीप गांधलीकर), दर बुधवारी ‘एक कवी वेश्या वस्तीत’ (दत्ता गुरव), दर गुरुवारी ‘क्रांतिकारकांचा आत्मयज्ञ’ (सुभाष चव्हाण), दर शुक्रवारी ‘सिनेमाच्या आठवणी’ (सुरेश कंक), दर रविवारी ‘बावनकशी शब्दधन’ (वर्षा बालगोपाल) या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा समावेश राहील.

कवी दत्ता हगवणे, बी.एस. बनसोडे आणि मनमोहन जालेलपोलू यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनात मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, सानिका जोशी, वैशाख बालगोपाल आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् कर्मचारी यांनी सहकार्य केले.

सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले; तर सुहास घुमरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.