Pimpri News: घरपट्टी, पाणीपट्टीचे उद्दिष्ट अपूर्णच; घरपट्टीतून 577 तर पाणीपट्टीतून 44 कोटींचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – घरपट्टीत 870 कोटी आणि पाणीपट्टीचे 100 कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवणारी पिंपरी-चिंचवड महापालिका या उद्दिष्टापासून कोसो दूर आहे. घरपट्टीतून 577 कोटी रुपये, तर पाणीपट्टीतून 44 कोटी रुपये वर्षाअखेरिस वसूल झाले आहेत. यामुळे आर्थिक नियोजन घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

निवडणूक वर्ष असल्याने सत्ताधा-यांनी करवाढ प्रस्ताव टाळले आहेत. अवैध बांधकाम शास्तीचा गुंता कायम राहिल्याने करवाढ, दरवाढ न करता घरपट्टी, पाणीपट्टी कायम ठेवली. त्यामुळे का होईना नागरिक मोठ्या प्रमाणावर करभरणा करतील, अशी सत्ताधा-यांना अपेक्षा होती. मात्र, कोरोना महामारी, विभागप्रमुखांचे उत्पन्न वाढीकडे झालेले दुर्लक्ष, अनअनुभवी आयुक्त यांमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर संक्रांत आली आहे.

मालमत्ता कर आकारणी आणि कर संकलन विभागाला 2020-21 या आर्थिक वर्षात 870 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातच 600 चौरस फुट आणि 1 हजार चौरस फुटापर्यंतच्या अवैध बांधकामांना शास्तीकरात सवलत दिल्याने करसंकलनात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, अंदाजपत्रकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यातही करसंकलन विभाग अपयशी ठरला आहे.

शहरात साडेपाच लाख मालमत्ता असताना 31 मार्च अखेरिस घरपट्टीतून अवघे 577 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पाणीपट्टीसाठी 100 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 44 कोटी 15 लाख रुपयांचा महसूल महापालिकेला मिळाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे देखील उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही.

सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मार्चअखेरीस वसुलीचा जोर असतानाही महापालिकेत मात्र उदासिनता होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.