Pimpri News: रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

आरटीओ पिंपरी चिंचवड, न्यु पिंपरी चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि आयडीटीआरच्या वतीने रस्ता सुरक्षा प्रशिक्षण शिबिर

एमपीसी न्यूज – नियमांचे पालन न करणे, निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे बहुतांश अपघात होतात. अपघाताच्या घटनांमध्ये काहीजण व्यक्तिगत कारणांमुळे इतरांना इजा पोहोचवतात. अपघात कमी करण्यासाठी राबविण्यात येणारे रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत 32 वे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत चांगले आणि दर्जेदार वाहन चालक तयार करण्याच्या उद्देशाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड, न्यू पिंपरी चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग रिसर्च सोसायटी (आयडीटीआर) कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षा प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

शिबिराचे उदघाटन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) अतुल आदे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, आयडीटीआरचे प्राचार्य राजीव घाटोळे, एनपीसीएमडीएसएचे अध्यक्ष स्वप्नील पवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, मनोज ओतारी, संघटनेचे पदाधिकारी नानासाहेब शिंदे, अरुण शहा, नंदकुमार चव्हाण, बबनराव मिसाळ, विजयसिंह परदेशी, मनीष चव्हाण, मुसा शेख, संतोष आयोळकर, सतीश काळे, तुषार दळवी, पैगंबर सय्यद, स्वप्नील चव्हाण, अमित शहा, कन्हैया पुजारी आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “वाहन चालक जोपर्यंत वाहन चालवताना गैरवर्तणुक करणे थांबवत नाहीत तोपर्यंत अपघात होतील. कायदा, नियम पाळणे हा सर्वात महत्वाचा धर्म आहे. या धर्माचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. भारतात अनेक लोक नियमांचे पालन करत नाहीत. पण हेच लोक जेंव्हा विदेशात जातात तिथे ते मुकाटपणे नियम पाळतात. दुर्घटना टाळणे फार सोपी गोष्ट आहे. ओव्हर स्पीडिंग, डिस्ट्रक्शन टू ड्रायव्हर, रेड लाईट जम्पिंग न करणे असे साधे साधे नियम आहेत, जे पाळणे आवश्यक आहे.

काहीजण जाणीवपूर्वक वाहतुकीचे नियम मोडून वाहतूक पोलिसांकडे येतात आणि पैशाची गर्मी दाखवत स्वतः फाईन मारायला लावतात. पण नियमभंग करणाऱ्या नागरिकांच्या खात्यातून पैसे जात नसल्याने त्यांना त्याचा दुष्परिणाम कळत नाही. पण आता त्यांच्या खात्यातून पैसे कट होतील अशी व्यवस्था केली जात आहे.

आरटीओ अतुल आदे म्हणाले, “रस्ते अपघात कमी करणे ही रस्त्यावर चालणा-या सर्व घटकांची सामूहिक जबाबदारी आहे. पिंपरी चिंचवड आरटीओ हद्दीतील सुमारे 40 लाख लोकसंख्या आहे. त्यात वाहन संख्या सुमारे 20 लाख एवढी आहे. म्हणजे प्रत्येक कुटुंबात सरासरी दोन वाहने आहेत. दरवर्षी रस्ते अपघातात 10 टक्क्यांनी घट करण्याचे उद्धिष्ट केंद्रीय स्तरावर ठेवण्यात आले. मात्र अनेकांना हे उद्दिष्ट पूर्ण करता आलेलं नाही. त्यामुळे यावर्षी एक महिन्याचा हा कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.

मागील वर्षी झालेल्या अपघातांमध्ये 271 जणांचा मृत्यू झाला. तर 394 नागरिक जखमी झाले. यावर्षी हे प्रमाण कमी होऊन 525 अपघातात 253 मृत्यू तर 332 जखमी झाले आहेत.

होणाऱ्या अपघातांमध्ये वाहन चालकांच्या चुका कारणीभूत आहेत. कायद्याच्या धाकाने नको तर स्वयंस्फूर्तीने आणि स्वतःच्या, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी नियम पाळायला हवेत.  अपघातात घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाची कधीही न भरून येणारी हानी होते. हेल्मेट, सीटबेल्ट लावणे यासह सर्व नियम पाळलेच पाहिजेत, असे आवाहन देखील आदे यांनी केले.

वाहन चालक प्रशिक्षण संस्थांनी सुद्धा स्टेअरिंग, क्लच, ब्रेक, गिअर एवढ्या पुरतं मर्यादित न ठेवता त्यासोबत सुरक्षित वाहन चालविण्यावर जास्त भर द्यायला हवा. रस्त्यावर अपघात झाल्यास काहीजण केवळ बघ्याची भूमिका घेतात. अनेकजण फोटो काढत बसतात. तर असे न करता नागरिकांनी अपघातग्रस्त व्यक्तींना गोल्डन हावरमध्ये उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करायला हवं. रस्त्यावरील वावर प्रत्येकाने सुरक्षित करायला हवा, असेही आदे म्हणाले.

राजीव घाटोळे म्हणाले, “दरवर्षी हे अभियान एक आठवडा चालवलं जायचं. पण यावर्षी एक महिन्याच्या कालावधीत राबवले जातात आहे. रस्त्यांवरील 83 टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. तामिळनाडू राज्याने एक वर्षात 53 टक्के रस्ते अपघात कमी केले. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंचा आकडा कमी करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. दरवर्षी भारतात सुमारे दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून चांगले उद्धिष्ट साध्य होईल.

सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले, “जगात दरवर्षी 12 ते 13 लाख लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा कमी करण्यासाठी वाहन चालकांमध्ये वर्तनात्मक बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रशिक्षणाची मोठी मदत होणार आहे. प्रशिक्षणासाठी नागरिकांनी येणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. वाहतुकीच्या नियमांचं पालन का करायचं हे या शिबिरातून सांगितलं जाईल.”

श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्नील पवार यांनी प्रास्ताविक केले. नाना शिंदे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.