corona vaccination News: पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे कोरोना लसीकरणासाठी गेलेल्या ज्येष्ठांना मनस्ताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन अतिशय ढिसाळ आहे. ज्येष्ठांना लसीकरणासाठी तासंतास केंद्रावर बसावे लागत आहे. काही केंद्रावर लसीकरणाची तयारी पूर्ण झालेली नाही. तिथे गर्दी होत आहे. सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला होता. त्यातूनच ज्येष्ठांना कोरोनाची लागण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पालिकेच्या या गलथान कारभाराचा ज्येष्ठांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नियोजनात महापालिकेने सुधारणा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरु झाला आहे. या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस टोचण्यात येत आहे. परंतु, नियोजनाचा मोठा अभाव आहे. लसीकरणासाठी नोंदणी करण्याच्या को-विन 2.0 या ॲपलासुद्धा अडथळ्यांचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. को-विन ॲप डाउनलोड होत नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या. लसीकरणासाठी नागरिकांना नेमकी माहिती मिळत नव्हती.

ज्येष्ठ नागरिकांनी सरकारी रुग्णालयात मोठ्या उत्साहाने नावनोंदणी केली. त्यांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून ‘एसएमएस’ देखील आले. त्यानुसार ते महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात गेले. परंतु, तेथे कोणत्याही प्रकारचे नियोजन नव्हते. सोमवारी लसीकरण सुरु झाले नव्हते. ज्येष्ठांना तासंतास केंद्रावर बसावे लागत आहे. ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागला.

लसीकरणासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याठिकाणी सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला. त्याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले होते. त्यातूनच ज्येष्ठांना कोरोनाची लागण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने काटेकोरपणे नियोजन करावे. लसीकरणासाठी ज्यांचा नंबर आलेला असेल त्यांना त्याचदिवशी लस घेण्यासाठी बोलवावे. नियोजनात सुधारणा करावी अशी मागणी ज्येष्ठांकडून केली जात आहे.

ॲप सरकारने विकसित केले आहे. त्यात महापालिकेचा काही दोष नाही. नियोजनातील त्रुटी दूर केली जातील. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी selfregistration.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

‘येथे’ होतेय लसीकरण !

पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय चिंचवड, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, यमुनानगर रुग्णालय आणि ईएसआय रुग्णालय चिंचवड येथे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.