Pimpri News: ‘आर्थिक देवाणघेवाण’चे आरोप झालेल्या डॉक्टरांच्या विषयाला ‘मुहूर्त’ मिळेना; महासभा पुन्हा तहकूब

यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्याही काही नगरसेवकांचा आरोप आहे.

एमपीसी न्यूज – आर्थिक देवाणघेवाणीसह विविध आरोपांनी गाजत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भरती केलेल्या डॉक्टरांना कायम करण्याच्या विषयाला काही केल्या मुहूर्त मिळेनासा झाला आहे. कोरोनाच्या महामारीतही जवळपास पाच ते सहा महिन्यांपासून सत्ताधा-यांनी या विषयाचे घोंगडे भिजत ठेवले. या विषयावर विविध आरोप-प्रत्यारोप करत नगरसेवकांनी आज (शुक्रवारी) झालेल्या महासभेत जवळपास अडीच तास चर्चा केली. पण, शेवटी या विषयावरुनच पुन्हा महासभा 26 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली.

यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्याही काही नगरसेवकांचा आरोप आहे.

महापालिकेची जुलै महिन्याची तहकूब सभा आज, शुक्रवारी आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

राज्य सरकारच्या आदेशानुसार महासभा ‘व्हिडीओ कॉन्फरसद्वारे’ घेतल्या जात आहेत. काही नगरसेवक आपल्या घरुन तर काही सभागृहातून या सभेत सहभागी झाले होते.

पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या भरतीसाठी महापालिकेने 3 डिसेंबर 2019 रोजी मुलाखत घेतल्या. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2020 रोजी निवड झालेल्या व प्रतिक्षेतील डॉक्टरांची यादी जाहिर करण्यात आली. तेव्हापासून हे सर्व डॉक्टर्स नियुक्ती पत्राची वाट पहात आहेत.

निवड झालेले 60 डॉक्टर्स तसेच तत्पूर्वी भरती केलेले डॉक्टर मिळून 103 जणांच्या नियुक्तीचा हा प्रश्न आहे.

प्रशासनाने रितसर सर्व प्रक्रीया पूर्ण केली. त्यानंतर पालिकेच्या विधी समितीने जवळपास महिनाभर हा विषय तहकूब ठेवला होता. समितीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक रकमेच्या मागणीचे आरोप झाले.

अखेरीस कार्यकाल संपण्याच्या शेवटच्या 12 जूनच्या तहकूब सभेत विषयाला मान्यता दिली होती.

त्यानंतर हा विषय अंतिम मान्यतेसाठी महासभेसमोर आला. पण, सभेत देखील त्याला मुहूर्त मिळालेला नाही. आज सुरुवातीला उपमहापौर तुषार हिंगे यांनी डॉक्टर भरतीच्या विषयाला उपसूचना दिली.

त्यानंतर या विषयावर नगरसेवकांनी जवळपास अडीच तास चर्चा केली. सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनीही त्याला विरोध केला.

माजी सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, डॉक्टरांचा अवमान करु नका, ते चांगले काम करत आहेत. राज्यातील सर्वांत कमी मृत्यूदर शहराचा आहे. भरती प्रक्रियेची सीबीआय, सीआयडी चौकशी करा.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, डॉक्टरांच्या भरती प्रकियेची चौकशी करावी. विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, डॉक्टर भरतीचा विषय तहकूब करावा.

शेवटी सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, डॉक्टर चांगले काम करत आहेत. त्यांना नाउमेद करु नका. बोलत असताना मध्येच त्यांनी अचानक आजची सभा 26 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली.

त्याला शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला. मात्र, सभा पूर्ण करण्याची त्यांची मागणी धुडकावत महापौर उषा ढोरे यांनी जुलै महिन्याची तहकूब महासभा पुन्हा 26 ऑगस्ट दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.