Pimpri news: गणवेश देय रक्कम महापालिका कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार
या रकमेत दरवर्षी 10 टक्के वाढ राहणार
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील वर्ग एक ते चारमधील सर्व कर्मचाऱ्यांची गणवेश देय रक्कम यापुढे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या रकमेत दरवर्षी 10 टक्के वाढ राहणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे. यामुळे कर्मचारी महासंघाने केलेल्या मागणीला यश आले आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना दरवर्षी गणवेश, पावसाळी आणि हिवाळी साधने पुरविण्यात येतात. याबाबत वेळोवेळी निविदा प्रसिद्ध केल्या जात होत्या. त्यामुळे कायमच दिरंगाई होत होती. तसेच कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या साधनांचा दर्जा सुमार असायचा, यामध्ये कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत होती. यातून कर्मचाऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी महासंघाने प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
राज्य शासनाच्या डिसेंबर 2016 च्या परिपत्रकाप्रमाणे लाभार्थ्यांना देय रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या धोरणाचा अवलंब करण्यात आले. त्याचधर्तीवर महासंघाच्यावतीने याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती.
याबाबत 28 एप्रिल 2021 रोजी कर्मचाऱ्यांना गणवेशाऐवजी थेट रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश आयुक्तांनी पारीत केला आहे. त्यामुळे कर्मचारी गणवेशाबाबत यापुढे कोणतीही दिरंगाई अथवा हस्तक्षेप होणार नाही. कायमस्वरूपी गणवेशाची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे म्हणाले, “महापालिका इतिहासात पहिल्यांदाच असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश खरेदी करता येणार आहे. त्याचा त्यांच्या राहणीमानावर व कामकाजावरही चांगला परिणाम होणार आहे. याबाबत सर्व कर्मचारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे”.