Pimpri News: शहरातील चौकांचे सुशोभीकरणाचे काम सलग 75 तास सुरु राहणार

एमपीसी न्यूज – “आझादी का अमृत महोत्सव” या अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभागातील मोठ्या चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सलग 75 तास काम सुरु ठेवून ते पूर्ण करत 26 जानेवारी रोजी त्याचे लोकार्पण केले जाणार असल्याचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये 2022 या वर्षात “आझादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका देखील स्मार्ट सिटीच्या माध्यमातुन “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यासाठी नागरिकांनी उपयुक्त होईल व त्यामध्ये नागरिक सहभागी होतील असा उपक्रम राबवित आहे. या महोत्सवामध्ये शहरातील नागरिकांना सामावून घेतल्यामुळे देशाप्रती देशप्रेम, भारतमाते विषयी आदर या शिवाय मी या शहराचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी काय ? याची जाण या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये निर्माण होण्यास मदत होणार आहे.

या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुदर्शननगर चौक, सांगवी या ठिकाणी सब-वे च्या वर सुमारे 35000 चौरस फुटात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत सलग 75 तास काम सुरु ठेवून ते पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये 8 ते 80 वयोगटातील नागरिकांना उपयुक्त होईल अशी व्यवस्था केल्यामुळे याला “ 8 ते 80 प्लाझा” असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी स्केटींग रींग, स्केटर्स, जॉगींग ट्रॅक, वृध्दांना वाचन करणे, गप्पाटप्पांना बसावयाची व्यवस्था, व्यायामासाठी जागेची व्यवस्था, ओपन जीम इक्वीपमेंट, भावगीते-भक्तीगीते ऐकण्यासाठी म्युझीक सिस्टीम बसविण्यात येणार आहे. हे काम 23 जानेवारी पासून सुरु करण्यात आले असून ते सलगपणे पूर्ण करुन 26 जानेवारी 2022 या प्रजासत्ताक दिनी उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात येणार आहे.

अशा प्रकारे शहरातील आठही प्रभागातील विविध इतर 8 ठिकाणच्या मोठ्या चौकांचा “आझादी का अमृत महोत्सव” उपक्रमात अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या अंतर्गत या ठिकाणीही सलग 75 तासांमध्ये काम सुरु ठेवून चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या चौकांमध्ये सुशोभीकरणाअंतर्गत नागरिकांना उपयुक्त होतील अशा प्रकारे नियोजन करण्यात येणार आहे. याचेदेखील सलग 75 तास काम सुरु ठेवून ते 26 जानेवारी 2022 या प्रजासत्ताक दिनी या चौकांचे उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.