Pimpri News: …तर गर्दी होणाऱ्या चौकात जमावबंदी लागू करणार – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – लग्न अथवा इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक संख्या आढळल्यास आयोजकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. भरारी पथकांची तपासणी मोहिम अधिक प्रभावीपणे राबवावी. सूचना देऊनही अनावश्यक गर्दी होत असलेल्या चौक परिसरात जमावबंदी लागू करावी लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.

कोरोना रुग्णवाढीचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात असून महापालिकेची रुग्णालये सर्व सुविधांनी अद्यावत असावे यासाठी महापालिका प्रशासन काम करीत आहे असे सांगून आयुक्त राजेश पाटील म्हणाले, कोरोना बाधित रूग्ण होम आयसोलेशनला प्राधान्य देत आहेत. बेड मॅनेजमेंट चांगले होण्यासाठी प्रशासनाने महापालिका रुग्णालये आणि खासगी रुग्णालये यांचा आराखडा तयार केला आहे.

महापालिका रूग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा आणि मनुष्यबळ याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. लसीकरण केंद्रांची उभारणी शहरातील विविध भागात केली जात असून क्षेत्रीय अधिका-यांना केंद्राचे योग्य ठिकाण निवडून तेथे केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोना विषयक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी प्रशासनाला दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.