Pimpri News : … तर पालिकेत मोकाट कुत्री सोडू- संभाजी ब्रिगेडचा इशारा

रस्त्यारस्त्यावर मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.

एमपीसीन्यूज : गेले अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात गर्दीच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा; अन्यथा महापालिका भवनात मोकाट कुत्री सोडण्यात येतील, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, अगोदरच कोरोना महामारीमुळे सर्व नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यारस्त्यावर मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.

शहराच्या विविध भागात लहान मुलं, महिलांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी सुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रस्त्यांवरून ये जा करणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पुढे अचानक ही मोकाट कुत्री येऊन अपघात देखील झाले आहेत.

तसेच मोकाट कुत्र्यांकडून दुचाकी वाहनाचा पाठलाग करणे असे प्रकार घडत आहेत. अशा अपघातात अनेकांना मोठी दुखापत होत आहे.

यामधील काही जणांना तर कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे.

पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल तर आणि अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असेल तर दुर्दैवच म्हणावे लागेल.

येत्या आठ दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर संभाजी ब्रिगेड महानगरपालिकेत मोकाट कुत्री आणून सोडेल, अशा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते आणि जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.