Pimpri News : कष्टकऱ्यांना आर्थिक मदत न मिळाल्यास उद्रेक होईल – बाबा कांबळे

एमपीसीन्यूज : रिक्षा चालक, फेरीवाले, घरकाम महिला, गटाई कामगार यांना महापालिकेच्यावतीने आर्थिक मदत मिळावी यासाठी आज कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कष्टकरी जनतेच्या शिष्टमंडळास भेट नाकारल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

कष्टकरी जनता आघाडी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, टपरी, पथारी, हातगाडी पंचायत, घरकाम महिला सभा, रिक्षा ब्रिगेडच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

कोरोनामुळे आर्थिक अडचणीमध्ये आलेलया गोर-गरीब, आर्थिक दुर्बल घटकांना तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. परंतु, अशी मदत करता येणार नाही, असे मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केले. यामुळे कष्टकरी बहुजन मागासवर्गीय जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. गरीबीची थट्टा केली जात असून आर्थिक अडचणीमध्ये असताना कष्टकऱ्यांना हिणवले जात आहे. या माध्यमातून अपमान केला जात असल्याचा आरोप बाबा कांबळे यांनी केला.

आंदोलनात घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिता सावळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे , शहराध्यक्ष रमेश शिंदे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार, रिक्षा ब्रिगेडचे प्रमुख बाळासाहेब ढवळे, शहराध्यक्ष धनंजय कुदळे, विजय ढगारे, अविनाश जोगदंड, लक्ष्मण शेलार, तुषार लोंढे, जाफर भाई शेख, सिद्धेश्वर सोनवणे, सूरज सोनवणे, अजय साळवे, प्रदीप अहिरे, नंदलाल निकम आदी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.