Pimpri news: महापालिकेची तीन हजार रुपयांची मदत मिळण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे द्यावी लागणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत लॉकडाऊन कालावधीत शहरातील परवानाधारक रिक्षाचालक, पथविक्रेते, घरेलु कामगार, बांधकाम मजूर, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे वाहन चालक, जिम ट्रेनर, लोक कलावंत आणि बँड पथक यांना तीन हजार रुपयांची एकदाच मदत केली जाणार आहे. ही मदत मिळविण्यासाठीचे निकष महापालिकेने निश्चित केले आहेत. महापालिका हद्दीतील रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्रासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यांना नागरवस्ती विभागामार्फत तीन हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी (दि.30) होणाऱ्या महासभेसमोर अंतिम मान्यतेसाठी ठेवला आहे.

कोरोनामुळे महापालिकेची एप्रिल महिन्याची महासभा घेतली नव्हती. आता शुक्रवारी (दि.30) ऑनलाइन पध्दतीने महापालिका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना घरबांधणी, भूखंड खरेदी, घर दुरुस्ती, घरविस्तार अग्रीम दिले जाते. त्याबाबत धोरण निश्चित करण्याचा प्रस्ताव, पवना धरण पाईपलाईन आंदोलनाच्यावेळी गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना महापालिका सेवेत घेणे आणि लॉकडाऊन काळात आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना तीन हजार रुपयांची मदत करण्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला आहे.

शहरातील परवानाधारक रिक्षाचालक, पथविक्रेते, घरेलु कामगार, बांधकाम मजूर, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर, लोक कलावंत आणि बँड पथक यांना तीन हजार रुपयांची एकाचवेळी मदत केली जाणार आहे. सर्वांना मदत मिळवण्यासाठी महापालिका हद्दीतील रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी लागणार आहे. तसेच आपल्या क्षेत्रातील नोंदणीची माहिती द्यावी लागणार आहे.

परवानाधारक रिक्षाचालकाला अर्जासोबत आरटीओकडून मिळालेल्या बॅच बिल्ला आणि लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्राची (आरसी), रिक्षा परमिटची झेरॉक्स द्यावी लागणार असून सत्यप्रत आवश्यक आहे. पथविक्रेते यांना महापालिकेकडून मिळालेल्या परवान्याची आणि पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेअंतर्गत महापालिकेने दिलेल्या शिफारस पत्रांची झेरॉक्स द्यावी लागणार आहे.

चर्मकारला दुकान परवान्याची झेरॉक्स ( शॉपऍक्ट परवाना प्रत), शासकीय, महापालिकेचे नोंदणी प्रमाणपत्र (असल्यास), नाभीक दुकान परवान्याची झेरॉक्स ( शॉपऍक्ट परवाना प्रत), एका दुकानासाठी जास्तीत जास्त पाच कामगारांना अर्थसहाय्य देय राहील, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे वाहन चालक (शाळेच्या पे-रोलवरील वगळून) आरटीओकडून मिळालेल्या परवान्याची आणि लायसन्सची झेरॉक्स, शाळेचे मान्यता पत्राची सत्यप्रत, जिम व्यावसायिक शॉपऍक्ट लायसन्सची झेरॉक्स, एका जिमसाठी जास्तीत जास्त पाच जिम ट्रेनर यांना अर्थसहाय्य देय राहील, जिम ट्रेनरने किमान सहा महिने कालावधीचा जिम ट्रेनर कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

लोककलावंत यांना लोककलावंत असल्याबाबतचे शासकीय नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स किंवा नोंदणीकृत नाट्यकला संस्कृतीक क्षेत्राशी संबंधित, अधिकृत संस्थेशी निगडीत कलावंत सभासद असल्याबाबतचा पुरावा आवश्यक, घरेलू कामगारांना घरेलू कामगार शासकीय नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स (कामगार आयुक्त यांच्याकडील नोंदणी, नोंदणी शुल्क भरल्याची पावती), बांधकाम मजूर यांना शासकीय नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स (कामगार आयुक्त यांच्याकडील नोंदणी, नोंदणी शुल्क भरल्याची पावती) आणि बँड पथक यांना दुकान परवान्याची झेरॉक्स ( शॉपऍक्ट परवाना प्रत), एका पथकासाठी जास्तीत जास्त पाच वाजत्री कलाकारांना अर्थसहाय्य देय राहील. सर्वांना योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिका हद्दीतील रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी लागणार आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागाच्या इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत कोविड दिलासा हे नवीन उपलेखाशिर्ष करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध लेखाशिर्षवरील 14 कोटी 65 लाख रुपये रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. वापरलेली रक्कम नागरवस्ती विकास योजना विभागाकडील संबंधित योजनांसाठी आवश्यक असल्याने पुढील चार महिन्यात लेखा विभागाने उपलब्धता करून द्यावी. तसेच या योजनेतील आखर्चित राहिलेली रक्कम नागरवस्ती विकास योजना विभागास संबंधित योजनांवर खर्च करण्यास मान्यता देण्याचा विषय महासभेसमोर ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.