Pimpri News: महापालिकेचे नूतन आयुक्त राजेश पाटील यांचा ‘असा’ आहे परिचय

एमपीसी न्यूज – ओडिशा केडरचे 2005 च्या बॅचचे राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पाटील हे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील ताडे या गावचे रहिवाशी आहेत.

प्रशासकीय सेवेचा त्यांचा 14 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी कोरापूत, कंधमाळ आणि मयूरभंज येथे आठ वर्षे जिल्हाधिकारी म्हणून कार्य केले आहे. ओडिशा कौशल्य विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून दोन वर्ष कार्य केले.

डायरेक्टर स्पेशल प्रोजेक्ट व जीविका मिशनचे सीईओ म्हणून ते कार्यभार सांभाळत आहेत. यात मनेरगा, पीएमवाय, एनआरएल आणि डीडीयूजीकेवाय या योजनांचा समावेश आहे.

मयूरभंज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना राबविलेल्या ‘मु भी पढिबी’ (मला पण शिकायचयं) या स्वतंत्र उपक्रमातून जिल्ह्याला शालाबाह्य मुल नसलेला व बालकामगार नसलेला जिल्हा करण्यात ते यशस्वी झाले. यामध्ये मयूरभंज देशातील पहिला जिल्हा ठरला. हा उपक्रम पुढे आएलओ व यूएनआयसीईएफ या संस्थाकडून अभ्यासला गेला.

_MPC_DIR_MPU_II

टीईडीएक्स स्पीकर होण्याचा मानही त्यांना मिळाला. जंगल अधिकार कायदा, 2006 अंतर्गत दोन जिल्हे मिळून 80,000 परिवारांना वैयक्तिक अधिकाराचे उतारे देण्यात यशस्वी, कौशल्य विकास प्राधिकरणाचे सीईओ असताना अश्वत नारायण याने 2019 मध्ये रशियातील कंझान येथे झालेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. त्याच्या जडणघडणीत पाटील यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे.

2008 चा महापूर तसेच 2012 साली आलेले चक्रीवादळ, त्यानंतरचा पूर याचे नियोजन व आपत्ती व्यवस्थापन यात त्यांनी मोठी भूमिका बजाविली. शिक्षण, बालविकास, बालकामगार निर्मुलन व पुनर्वसन, व्याघ्र प्रकल्प इत्यादी क्षेत्रातील कार्याचा गौरव प्रसार केला.

राजेश पाटील यांना 2014 मध्ये दिव्यांग सक्षमीकरण आणि पुनर्वसनासाठी राष्ट्रपती पारितोषिक, 2015 मध्ये एमजीएनआरजीएस या योजनेतील उल्लेखनीय कामासाठी प्रधानमंत्री पारितोषिक, 2016 मध्ये सौर उर्जेवर आधारित पेयजल योजनेसाठी राष्ट्रीय पारितोषिक, 2015, 2016 मध्ये सर्वात प्रभावशाली व अभिनव उक्रमासाठी असलेले मुख्यमंत्री पारितोषिक, 2016 मध्ये ग्रामीण भागातील गृहनिर्माण या योजनेसाठी सर्वोत्कृष्ट कार्याचे पारितोषिक, स्वशिक्षण या शिक्षणासंबंधीत उपक्रमाला राष्ट्रकुल स्तरावरील सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले आहे.

राजेश पाटील लिखित ‘ताई मी कलेक्टर व्ह्यानु’ हे सुप्रसिद्ध पुस्तक इंग्रजीसह सहा भाषेत भाषांतरित झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.