Pimpri News: स्थायी समितीत ‘यांची’ वर्णी; सभेत जोरदार गोंधळ, सोमवारपर्यंत सभा तहकूब

एमपीसी न्यूज – आर्थिक बाबींबाबतचे निर्णय घेणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भालेकर, राजू बनसोडे, शिवसेनेच्या मीनल यादव आणि अपक्ष आघाडीच्या नीता पाडाळे या आठ सदस्यांची वर्णी लागली आहे. आज (गुरुवारी) महासभेत या सदस्यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, अपक्ष आघाडीचे गटनेते नसल्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांचे नाव कोणी द्यायचे यावरून जोरदार गोंधळ झाला. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नवनाथ जगताप हे आक्रमक झाले होते. यावरून मोठा गोंधळ आहे. त्यामुळे सोमवार पर्यंत सभा तहकूब करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य आहेत. त्यात भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.

भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य समितीत आहेत. त्यातील स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सदस्य आरती चौंधे, शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि भाजप संलग्न अपक्ष आघाडीच्या झामाबाई बारणे यांचा दोन वर्षाचा कार्यकाल 28 फेब्रुवारीला संपणार आहे.

सदस्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार आजच्या महासभेत नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. गटनेत्यांनी बंद  पाकीटातून नावे दिली. त्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी सदस्यांची स्थायी समितीत नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.

दरम्यान, महापालिकेतील स्थायी समिती ही अत्यंत महत्वाची समिती आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व आर्थिक बाबींचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे या समितीवर वर्चस्व असणा-यांचा महापालिका कारभारात बोलबाला असतो. महापालिकेचा कारभार ही समिती हाकत असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.