Pimpri News : थोर महापुरुषांच्या विचार आणि कार्यामुळे समाजाला योग्य दिशा मिळाली – महापौर उषा ढोरे

एमपीसी न्यूज – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक परिवर्तन घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून या थोर महापुरुषांच्या विचार आणि कार्यामुळे समाजाला योग्य दिशा मिळाली असे प्रतिपादन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार उपक्रमांतर्गत 11 ते 14 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधनपर्वाचे उद्घाटन आज महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, नगरसेवक संतोष लोंढे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, उपअभियंता संजय खरात, एकता कर्मचारी संघटनेचे गणेश भोसले,माहित व जनसंपर्क विभागाचे सोमनाथ साबळे, देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, महात्मा फुले यांनी पत्नी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. सावित्रीबाईंनी अनेक कष्ट व त्रास सहन करून महिलांना शिक्षण दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसह उपेक्षित समाजाला न्याय मिळवून दिला. त्यामुळेच महिला आणि उपेक्षितांना सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महापालिका ऑनलाईन पध्दतीने साजरी करीत असून प्रबोधनपर्वाचे कार्यक्रम नागरिकांनी घरबसल्या आवर्जून पहावे. सामाजिक स्वास्थ्य उत्तम रहावे यासाठी या महापुरुषांनी दिलेली शिकवण प्रत्येकाला दिशादर्शक ठरत आहे.

सध्या कोरोना संकट काळात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाबाबतची सतर्कता अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे असून नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, स्वत:ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका करित असलेल्या कामामध्ये नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, “महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ऑनलाईन पध्दतीने विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात देखील महापुरुषांच्या वैचारिक वारसा नव्या पिढीपर्यंत जावा यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. कोरोना बाधीतांवरील उपचारासाठी महापालिकेने अनेक उपक्रम तसेच सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नियमांचे पालन काटेकोरपणे केल्यास कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास ढाके यांनी व्यक्त केला.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मातील अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करून परखड भुमिका घेतली. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक परिवर्तन झाल्याने समाजात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यांचे आचार विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी आपले योगदान देणा-या या थोर महापुरुषांच्या विचारांचे पालन आपण किती करतो याचे प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. चांगली पिढी घडविण्यासाठी या महापुरुषांच्या विचारांची नितांत गरज आहे असे आयुक्त पाटील म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी आभार मानले.

यानंतर प्रबोधनपर्वातील कार्यक्रमाला सुरुवात झाली. महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारा शाहिरी जलसा राजेंद्र कांबळे यांनी सादर केला. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित क्रांतीसूर्याची गाथा हा नाट्यप्रयोग पैस रंगमंचच्या वतीने सादर करण्यात आला. यानंतर भीमाची गाथा या गीतगायनाचा कार्यक्रम सुजाता कांबळे यांनी सादर केला तर सुधाकर वारभुवन यांनी प्रबोधनात्मक गीत गायन सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.