Pimpri news: शहरातील माथाडी कामगारांना तीन हजारांचे अर्थसहाय्य; इरफान सय्यद यांच्या प्रयत्नांना यश

शिवसेनाप्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या मागणीची राज्य शासनाकडून दखल

एमपीसी न्यूज – माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने शासनाच्या आदेशानुसार मंडळातील पुणे व पिंपरी चिंचवडमधील नोंदीत आणि कार्यरत माथाडी कामगारांना पाच हजारापर्यंत आर्थिक सहाय्य देण्याच्यानिर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या हप्त्यातील तीन हजार रुपये माथाडी कामगारांच्या खात्यात जमा करण्यात आले. यामुळे लॉकडाऊनचा फटका बसलेल्या माथाडी कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माथाडी मंडळाच्या प्रशासकीय किंवा राखीव निधीमधून नोंदणीकृत माथाडी कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत शासनाच्या कामगार विभागाने सूचना केल्या होत्या.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील माथाडी कामगार या लाभापासून वंचित होते. यासाठी शिवसेनाप्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील,  पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष, सचिव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने त्यांच्या मागणीची दखल घेऊन माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे.

याबाबत माहिती देताना इरफान सय्यद म्हणाले की, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य कामगार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगारांचा सरकारने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांमध्ये समावेश केलेला आहे.

त्यांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी 22 जून 2020 रोजीच्या पत्रान्वये कामगार विभागाने राज्यातील माथाडी मंडळांना माथाडी मंडळाच्या प्रशासकीय किंवा राखीव निधीमधून नोंदणीकृत माथाडी कामगारांना अर्थसहाय्य देण्याबाबत सूचना केल्या होत्या.

याचा लाभ पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील माथाडी कामगार मंडळ वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांना मिळाला.

मात्र, दोन्ही शहरातील कामगार लाभापासून वंचित होते. यासाठी पाठपुरावा केला. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील माथाडी कामगारांना लाभापासून वंचित न ठेवता त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली होती.

अखेर या मागणीला यश आले असून, राज्य शासनाने पुणे व पिंपरी चिंचवडमधील सुमारे 45000 कामगारांच्या खात्यावर प्रत्येकी 3000रुपयांची आर्थिक मदत जमा केली आहे.

या मागणीची दखल घेतल्यामुळे माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाआघाडी सरकारने
योग्य वेळी कामगारांची मागणीची दखल घेतल्यामूळे मोठा दिलासा मिळाला आहे

यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष परेश मोरे, जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव, किसन बावकर, सेक्रेटरी भिवाजी वाटेकर, मुरलीधर कदम, खंडू गवळी, उपाध्यक्ष ज्ञानोबा मुजूमले, सेक्रेटरी पांडूरंग कदम, सर्जेराव कचरे या पदाधिका-यांनी खूप पाठपुरावा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.