Pimpri news: सरकारला जागे करण्याची वेळ आली- इरफान सय्यद

एमपीसी न्यूज – आज प्रत्येक वर्ग रस्त्यावर उतरला आहे. भावी पिढीचे भविष्य अंधारात जाणार असल्याचे कामगारांनी ओळखले आहे. त्यामुळे ते रस्त्यावर उतरले आहेत. मोदी सरकारने शेतकरी, कामगार हिताच्या विरोधात पावले उचलली आहेत. सरकारला आज आपण जागे नाही केले. तर, त्यांनी जे कायदे आणले आहेत त्यानुसार दुसऱ्या मिनिटाला ते कामगारांना कामावरून काढू शकतात. त्यामुळे सरकारला जागे करण्याची वेळ आली असल्याचे, मत भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, खेड-भोसरी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पुणे व पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील सर्व संघटीत, असंघटीत कामगार संघटनाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आज (गुरुवारी) तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो कामागारांनी केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत फलक फडकवले.

या आंदोलनात भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक, इंटकचे कैलास कदम, शिवाजी खटकाळे, व्ही. व्ही. कदम, वसंत पवार, मनोहर गडेकर, नितीन पवार, अनिल औटी, उदय भट, किरण मोघे, सुमन टिळेकर, चंद्रकांत तिवारी, दिलीप पवार, दत्ता येळवंडे, किशोर ढोकले, अनिल रोहम, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, शैलेश टिळेकर, रघुनाथ ससाणे, शुभा शमीम, विश्वास जाधव, सुनिल देसाई, सचिन कदम, गिरीश मेंगे, शशिकांत धुमाळ या कामगार नेत्यांनी तसेच माजी नगरसेवक मारुती भापकर, मानव कांबळे आदींनी सहभाग घेतला.

इरफान सय्यद म्हणाले, कामगारांच्या हिताचे कायदे पारित करायचे असेल तर कामगारांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. रक्त सांडावं लागते. कोणतेही कायदे करताना समिती नेमली पाहिजे. पण, सरकारने समिती नेमली नाही. विरोधकांनी विरोध करून सुद्धा कामगार कायदे पारित केले आहेत. मागील आधिवेशनात प्रचलित 29 कामगार कायदे रद्द करून सुधारित चार जुलमी कायदे आणले. या कायद्यामुळे देशातील 95 कोटींहून जास्त संघटीत, असंघटीत कामगार, शेतमजूर व शेतकरी यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा संपुष्टात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करतो.

इंटक, आयटक, सिटू, एचएमएस, टीयुसीसी, एआययुटीयुसी, एआयसीसीटीयु, सेवा, युटीयुसी, भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र मजदूर संघ, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल, हिंद कामगार संघटना, श्रमिक एकता महासंघ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ तसेच विमा, बँक, संरक्षण, वीज महामंडळ, बीएसएनएल, केंद्र व राज्य सरकारी कामगार कर्मचारी, महापालिका / नगरपालिका कामगार कर्मचारी, नर्सेस व अन्य आरोग्य कामगार कर्मचारी, बांधकाम कामगार, घर कामगार, अंगणवाडी, आशा, इत्यादी योजना कर्मचारी, अंग मेहनत कष्टकरी, रिक्षा, पथारी-फेरीवाले, हमाल, बाजार समिती या क्षेत्रामधील केंद्रीय महासंघाशी संलग्न सर्व संघटनांनी देशभर केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.