Pimpri News: मुख्य रस्त्यांवरील धूळखात पडलेली बेवारस वाहने ‘टोईंग व्हॅन’ उचलणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यांवर वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या बेवारस वाहनांची महापालिका विल्हेवाट लावणार आहे. शहरात सुमारे तीन हजार बेवारस वाहने असून ही वाहने ‘टोईंग व्हॅन’द्वारे उचलली जाणार आहेत. त्यासाठी 10 ते 15 लाखांचा खर्च होणार आहे.

शहरातील रस्त्यांवर पडून असलेली बेवारस वाहने मोठी डोकेदुखी ठरत आहेत. विशेषतः गॅरेजसमोर मोठ्या प्रमाणात वाहने पडून असतात. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते, वाहनांच्या परिसरात झाडे – झुडपे वाढतात. त्यामुळे महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी अशी बेवारस वाहने उचलून मोकळ्या जागेत जमा केली होती ; मात्र पुन्हा शहरात बेवारस वाहनांची संख्या वाढली आहे. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा दाखला देत नगर विकास विभागाने महापालिकांना आदेश दिले आहेत.

महापालिकांनी बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची कारवाई करण्यासाठी पोलिसांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, नागरिकांना तक्रारी करण्यासाठी तक्रार निवारण केंद्र व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून द्यावा, ई – मेल, व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून द्यावा, निश्चित केलेल्या धोरणानुसार कारवाई करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले.

नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर त्याची नोंदवही तयार करण्यात यावी, संबंधितांना तक्रार क्रमांक देण्यात यावा. एवढेच नव्हे; तर निनावी तक्रारीदेखील घेण्यात याव्यात असे राज्य सरकारने आदेशात म्हटले आहे. उपायुक्तांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडूनच आढावा घेण्यात यावा, असे बंधनही घालण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने याबाबत पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांच्या पाहणीमध्ये तब्बल अडीच ते तीन हजार बेवासर वाहने शहरात विविध ठिकाणी आढळून आली.

त्यानुसार महापालिकेने ही बेवारस वाहने उचलण्याकरिता ‘टोईंग व्हॅन’ वाहने पुरविणाऱ्या संस्थांकडून दर मागविले होते. त्यामध्ये समीर एंटरप्रायजेस, महाराष्ट्र क्रेन सर्व्हिस आणि सिटी क्रेन सर्व्हिस यांनी दरपत्रक महापालिकेला सादर केले. त्यापैकी सर्वांत कमी दराचे समीर एंटरप्रायझेस यांचे दर स्वीकारण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली. त्यानुसार, समीर एंटरप्राजेस यांना बेवारस वाहने उचलण्याकरिता भाडेतत्वावर स्वयंचलित टोइंग वाहने पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. त्यासाठी 10 ते 15 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मोशी कचरा डेपोनजिक बेवारस वाहने टाकली जाणार आहेत. तेथून किती किलोमीटर अंतरावरुन वाहन उचलून आणले आहे. त्यानुसार संस्थेला मोबदला देण्यात येणार आहेत. पाच किलोमीटर वरुन चारचाकी उचलून आणल्यास 850, दहा किलोमीटर अंतरासाठी 1200, 15 किलोमीटर अंतरासाठी 1500 आणि 20 किलोमीटर अंतरासाठी 2 हजार 50 रुपये देण्यात येणार आहेत. तर, दुचाकी आणल्यास पाच किलोमीटरसाठी 400 रुपये, दहा किलोमीटरसाठी 650 रुपये, 15 किलोमीटर अंतरासाठी 700 आणि 20 किलोमीटर अंतरासाठी 925 रुपये देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.