Pimpri News: स्मार्ट सिटीचे पूर्णत्वास आलेले प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरीत करा; महापौरांची सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात अनेक विकास प्रकल्प सुरु आहेत. त्यापैकी काही पूर्ण तर अनेक प्रकल्प पूर्णत्वास असून हे प्रकल्प नागरिकांसाठी खुले करून देणेसाठी या प्रकल्पांचे उर्वरित कामे पूर्ण करून ते महापालिकेच्या संबंध‍ित विभागांकडे हस्तांतरीत करा, अशा सुचना महापौर उषा ढोरे यांनी केल्या.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या एबीडी व पॅन सिटी प्रकल्पांच्या कामांचा आज आणि उद्या दोन दिवसीय संचालक मंडळाचा पाहणी दौरा महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यानिमीत्त पहिल्या दिवशी पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरातील एबीडी (ऐरिया बेस डेव्हलपमेंट) अंतर्गत असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली.

सत्तारुढ पक्षनेते तथा संचालक नामदेव ढाके, नगरसेवक तथा संचालक सचिन चिखले, शहर अभियंता तथा सहमुख्य कार्यकारी अध‍िकारी (एबीडी) राजन पाटील, सहशहर अभियंता तथा जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहा. मुख्य कार्यकारी अध‍िकारी लक्ष्मीकांत कोल्हे, शिर्के कंट्रक्शनचे मॅनेजर नितीन कदम, प्रकल्प व्यवस्थापन लावण यांच्यासह अध‍िकारी – कर्मचारी उपस्थ‍ित होते.

तत्पूर्वी, शहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर येथील संपूर्ण एबीडी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये, विकास कामांची प्रगती, प्रकल्प पुर्ण होण्यास लागणारा कालावधी, त्यासाठी उपलब्ध निधी यासंदर्भात चर्चा करून उपलब्ध निधीतून अपूर्ण कामे पूर्ण करणे तसेच प्रस्तावित कामांबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर, पिंपळे गुरव येथील जिजामाता उद्यान, परिसरातील रस्ते, चौकांमध्ये सुरु असलेली कामे, कृष्ण विहार चौक येथील आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत तयार केलेले प्लेस मेकिंग, चिल्ड्रेंन प्ले ऐरिया, सुदर्शन चौकातील सेव्हन स्टार रोड, योगा पार्क, बीआरटी रोड, कोकणे चौकातील रस्ते, टॉयलेट ब्लॉक, फुट पाथ तसेच रहाटणी चौकात सुरु असलेल्या कामांना भेट देवून पाहणी केली. यावेळी, महापौर माई ढोरे यांनी नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या. तसेच, विकास कामांचे कौतुक केले.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, फेब्रुवारी 2022 पर्यंत संपूर्ण कामे नागरिकांसाठी खुली करायला हवी. त्यानुसार कामांचा वेग वाढवा. हातात घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरे काम हाती घेवू नका. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. अनेक कामे ही प्रगती पथावर आहेत. प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या रस्त्यांना जागेची अडचण असल्यास स्थानिक नगरसदस्यांच्या मदतीने सोडवून स्मार्ट सिटीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा, असे त्यांनी सांगितले.

नगरसेवक सचिन चिखले म्हणाले, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. शहरात स्मार्ट रस्ते, फुटपाथ या सारखे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प राबवित आहे. परंतु, अनेक ठिकाणी या नव्याने झालेल्या रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्याचे पाहावयास मिळते. तसेच, स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून विकासात भर पडत आहे. परंतु, खासगी केबल चालकांकडून या स्ट्रीट पोलचा उपयोग केबल टाकण्यासाठी करून घेण्यात येत असून महापालिकेच्या मदतीने हे सर्व अतिक्रमण काढण्यास कार्यवाही करावी. तसेच, विकास कामांच्या शिल्लक निधीतून नवीन कामे हाती घेण्यात यावीत, याबाबतच्या सुचना त्यांनी दिल्या. सह शहर अभियंता अशोक भालकर यांनी आभार मानून पहिल्या दिवसाचा दौरा पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.