Pimpri News: वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना महापालिकेला हस्तांतरित करा – आमदार महेश लांडगे  

एमपीसी न्यूज – वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर केलेल्या 30 दशलक्ष लीटर कोट्यासह पिंपरी- चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व  जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहात येथे बैठक घेण्यात आली.

पिंपरी- चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, आमदार अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर हिरानानी घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आदी उपस्थित होते.

याबाबत आमदार लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की,  पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेची सध्याची लोकसंख्या सुमारे 27 लाख एवढी आहे. सद्यस्थितीत शहरासाठी पवना नदीतून सुमारे 500 दशलक्ष लीटर (एमएलडी) इतके पाणी उचलले जाते.

_MPC_DIR_MPU_II

शहराची लोकसंख्या व उंचसखल असलेली भौगोलिक परिस्थिती विचारात घेता शहरात पाणी पुरवठ्याबाबत  मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे शहरात वाढीव पाण्याची नितांत आवश्यकता आहे.

पुणे महापालिकेकडील भामा-आसखेड योजना कार्यान्वित झाली असून, सदर योजनेतून त्यांना 200  दशलक्ष लीटर  प्रतिदिन इतका वाढीव पाणीपुरवठा सुरू झालेला आहे.

पुणे महापालिकेकडून वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पवना नदीतून 30 दशलक्ष लीटर प्रतिदिन इतके पाणी घेतले जात जाते. वाघोली योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र मौजे चिखली येथे असून तेथून वाघोली परिसराला पाणीपुरवठा केला जातो.

पुणे महापालिकेस सध्या खडकवासला, वरसगाव, टेमगाव, पानशेत, भामा भासखेड या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेस सध्या फक्त पवना नदीतून 400 एमएलडी प्रति दिन पाणी देण्यात येत असून, आंद्रा व भामा आसखेड धरणातून 260 एमएलडी पाणी कोटा मंजूर करण्यात आलेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून यापुढे या महापालिकेस वाढील पाणी कोटा मिळण्यासाठी नजीकचा भविष्यात कोणताही स्रोत उपलब्ध नाही, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.