Pimpri News: मानवाला उपयोगी झाडे, मानवच तोडायला चालला ही या काळातील वाईट घटना – सयाजी शिंदे

शेतकरी मागे राहिला की देश मागे राहिला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने निमा संस्थेला कराराने दिलेल्या भोसरीतील एक एकर जागेवर साडेचारशे आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करत उद्यान फुलविले आहे. झाडे 12 वर्षांची झाली आहेत. आता गैरसमजातून 450 झाडांचा बळी जाणार आहे. मानवाला सगळ्यात उपयोगी असलेली झाडे एक मानव तोडायला चालला आहे. ही या काळातील वाईट घटना असल्याचे सांगत वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला. ती झाडे वाचविण्याची विनंती पालिकेला केल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेने 12 वर्षांपूर्वी एक एकर जागा निमा या संस्थेला 21 वर्षांचा करारनामा करून दिली होती. या ओसाड जागेत निमा संस्थेने वनराई फुलवली आहे. साडेचारशे वनस्पती झाडे लावली आहेत. मात्र, अचानक ही जागा एमआयडीसीने विकल्याचे सांगून काही जण महापालिकडे झाडे तोडण्यास सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आज (बुधवारी) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली.

भूखंड परत निमा संघटनेला मिळावा. वृक्ष संवर्धन करावे अशी विनंती आयुक्तांना केली. नगरसेविका अनुराधा गोरखे, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, निमा संघटनेचे डॉ. महेश पाटील, डॉ अभय तांबिले, धनंजय शेडबाळे, पीसीसीएफचे तुषार शिंदे उपस्थित होते.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अभिनेते शिंदे म्हणाले, महापालिकेने करार करून 1 एकर जागा निमा संस्थेला दिली आहे. संस्थेने त्या जागेवर 450 वनस्पती झाडांची लागवड केली. 12 वर्षांची झाडे झाली आहेत. म्हणजे 12 वर्षांची मुले झाले सारखे आहे. आता कोणत्या तरी गैरसमजातून एमआयडीसीने ती जागा मोकळा स्पेस म्हणून जाहीर केली आहे. त्यामुळे 450 झाडांचा बळी जाणार आहे.

वनस्पती झाडे आहेत. मानवाला सगळ्यात उपयोगी असलेली झाडे एक मानव तोडायला चालला आहे. ही या काळातील वाईट घटना आहे. ती झाडे वाचवायची आहेत. ती वाचविण्याची विनंती आयुक्तांना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी मागे गेला की देश मागे गेला!
शेतकरी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. आज शेतकरी दिवस आहे. त्याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, एक देश मागे गेला की समजायचे त्या देशातील शेतकरी मागे गेला आहे. देश पुढे गेला की समजायचे शेतकरी पुढे गेला आहे. आपल्या देशातील शेतकरी मागे चालला आहे. शेतकरी पुढे गेला तर देश पुढे जाईल, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.