Pimpri News: ‘देशकार्यासाठी आयुष्‍य वेचणारा सच्‍चा स्वयंसेवक हरपला’

अमित गोरखे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा. गो. वैद्य यांच्‍या निधनाने प्रामाणिक, नि:स्‍वार्थ भावनेने देशकार्यासाठी आयुष्‍य वेचणारा सच्‍चा संघ स्‍वयंसेवक, हाडाचा पत्रकार हरपल्‍याची शोकभावना भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी व्‍यक्‍त केली आहे.

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे आदर्श स्‍वयंसेवक, संस्‍कृत पंडित, शिक्षक, पत्रकार, माजी विधान परिषद सदस्‍य अशा विविध भूमिका मा.गो. वैद्य यांनी यशस्‍वीरित्‍या पार पाडल्‍या.

राजकीय क्षेत्र असो वा अन्य राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने सोपविलेले कार्य, मिळालेल्‍या प्रत्‍येक जवाबदारीला मा.गो. वैद्य यांनी शतप्रतिशत न्‍याय दिला. संघकार्यासाठी त्‍यांनी आपले आयुष्‍य समर्पित केले.

संघाने दिलेली जवाबदारी सांभाळण्‍यात त्‍यांनी स्‍वतःला झोकून दिले. देश घडविण्‍याचे स्‍वप्‍न उराशी बाळगून स्‍वयंसेवकांची वाटचाल सुरु असते, अशा स्‍वयंसेवकांमधील एक म्‍हणजे मा.गो. वैद्य होत.

या ज्‍येष्‍ठ विचारवंताच्‍या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही त्यांनी शोक संदेशात म्‍हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.