Pimpri news: पंधरा दिवसात पालिका आयुक्तांचा ‘यु-टर्न’!

अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांच्या कामात पुन्हा फेरबदल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुन्हा आपल्या सवयीप्रमाणे पंधरा दिवसांत ‘यु-टर्न’ घेतला आहे. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांच्या कामकाज वाटपात अवघ्या पंधरा दिवसात आयुक्तांनी बदल केला आहे. आपणच घेतलेला निर्णय त्यांनी फिरविला आहे. त्यामुळे आयुक्तांच्या हेतूविषयी शंका निर्माण केली जात आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 27 ऑक्टोबर 2020 रोजी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आणि सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या कामकाजाचे वाटप केले होते.

डॉ. साळवे यांच्याकडे सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचे कामकाज, आरसीएमच, एनयूएचएम, पीसीपीएनडीटी, आरएनटीसीपी विषयक कामकाज, तारांकित, आतरांकित प्रश्न व इतर विषय हाताळणे, सोपविण्यात आलेल्या कामकाजाच्या बैठकीला उपस्थित राहणे, शासनास पत्रव्यवहार करणे, आवश्यक अशी मागणी केलेली माहिती पुरवणे, निबंधक, जन्म मृत्यू विषयी सर्व कामकाज व विवाह नोंदणी विषयक कामकाज सोपविण्यात आले होते.

तर सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे यांच्याकडे वायसीएम रुग्णालय वगळता वैद्यकीय मुख्य कार्यालय, पालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने यांचे कामकाज, मध्यवर्ती औषध भांडार व मध्यवर्ती साहित्य भांडार या विभागाचे सद्यस्थितीत चालू असलेले कामकाज, खासगी रुग्णालय नोंदणी विषयक व त्या अनुषंगाने इतर सर्व कामकाज, धन्वंतरी स्वास्थ योजनेचे संपूर्ण कामकाज, रुग्णलाय, दवाखाने या ठिकाणी कार्यरत असलेले गट ब, क, ड संवर्गात कामकाज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतरंग बदल्या करण्याचे अधिकार, सोपविण्यात आलेल्या कामकाजच्या बैठकीला उपस्थित राहणे, तारांकित, आतरांकित प्रश्न व इतर विषय हाताळणे, कोविड 19 विषयी संपूर्ण कामकाज, विभागप्रमुख म्हणून संपूर्ण कामकाज, कोविड 19 च्या अनुषंगाने तसेच इतरवेळी नियमित कामकाजच्या अनुषंगाने मानधनावरील नेमणुकाचे कामकाज सोपविण्यात आले होते.

या कामकाज वाटपाला पंधरा दिवस होत नाही तोपर्यंत आयुक्त हर्डीकर यांनी आपल्या निर्णयात बदल केला आहे. डॉ. साळवे यांच्याकडे वायसीएम रुग्णालय वगळता वैद्यकीय मुख्य कार्यालय, पालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने यांचे कामकाज, मध्यवर्ती औषध भांडार व मध्यवर्ती साहित्य भांडार या विभागाचे सद्यस्थितीत चालू असलेले कामकाज, रुग्णलाय, दवाखाने या ठिकाणी कार्यरत असलेले गट ब, क, ड संवर्गात कामकाज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतरंग बदल्या करण्याचे अधिकार, विभागाचे विभागप्रमुख म्हणून संपूर्ण कामकाज पुन्हा सोपविण्यात आले आहे.

तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडील कोविड केअर सेंटरचे संपूर्ण कामकाज डॉ. साळवे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर, डॉ. गोफणे यांच्याकडे खासगी रुग्णालय नोंदणी विषयक व त्या अनुषंगाने इतर सर्व कामकाज, धन्वंतरी स्वास्थ’ योजनेचे कामकाज देण्यात आले आहे.

 आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”डॉ. पवन साळवे यांना समज देण्यात आली आहे. कामकाज योग्य नसेल, तर कारभार काढून घेण्यात येईल. वरिष्ठ असल्याच्या जोरावार त्यांच्याकडे कारभार राहू शकणार नाही. त्यांना कामकाजात सुधारणा करावी लागेल, अशी समज दिली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.