Pimpri News: शहरातील अनधिकृत होर्डिंग्स सांगाड्यासह हटविणार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील अनधिकृत होर्डिंग्स जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सांगाड्यासह या होर्डिंग्स हटविण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र एजन्सीकडे हे काम देण्यात येणार आहे. या एजन्सी स्व:खर्चाने सांगाडे काढणार असून अनधिकृत होर्डिंग्स सांगाड्याच्या 80 टक्के भागाच्या विक्रीची रक्कम महापालिकेला मिळणार आहे.

महापालिका स्थायी समितीने त्याला मान्यता दिली. तसेच महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह अवलोकनाचे विषय आणि विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे 35 कोटी 51 लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. नितीन लांडगे होते.

केएसबी चौक ते देहु आळंदी रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क पध्दतीने डांबरीकरण करणे आणि स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामे करण्यासाठी 1 कोटी 40 लाख रुपये खर्च होणार आहेत.

प्रभाग क्रमांक 18 मधील गांधी पेठ, चिंचवड व इतर परिसरातील जलनिःसारण विषयक सुधारणा कामे करणे आणि उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्याकामी 25 लाख रुपये खर्च होणार आहेत.

नाशिक फाटा ते वाकड या 45 मीटर बीआरटीएस रस्त्याचे डांबरीकरण करण्याकामी 1 कोटी 40 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.