Pimpri News: पालिका, पोलीस आयुक्तांचा नियोजनशून्य मनमानी कारभार; गणेश भक्तांच्या भावनांशी खेळ – श्रीरंग बारणे 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नियोजनशून्य कारभार सुरु केला आहे. एकीकडे गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली. तर, दुसरीकडे गणेश विसर्जनाची कुठल्याही प्रकारची सोय न करता गणेश भक्तांच्या भावनांशी खेळ लावला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता दोन्ही आयुक्त मनमानी कारभार करीत आहेत, असा आरोप मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.

खासदार बारणे म्हणाले, घरात गणपती बसवा आणि घरातच विसर्जन करा, असा सल्ला पालिका आयुक्तांनी दिला आहे. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्त्या घरात विसर्जित करता येत नाहीत. कारण त्या पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे पर्यायाने त्या मुर्त्या कच-यातच जातील आणि मुर्त्यांची विटंबना होईल, हा मुलभूत विचार देखील पालिका आयुक्त करीत नाहीत. विसर्जन करण्यासाठी बंदी घालायची होती, तर प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्त्यांच्या विक्रीवर सुद्धा बंदी घालायला हवी होती. मूर्ती विक्रीच्या दुकानांच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे. पोलीस प्रशासनाला गणेश मूर्ती विक्री करणा-या दुकानांच्या समोरील गर्दी पांगवता आलेली नाही.

शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसाचे गणपती असतात. शहरात मोठ्या प्रमाणात घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश भक्त मनोभावे श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करतात. पण श्री गणेशाच्या विसर्जनाची सोय नसल्याने सर्व गणेशभक्त नाराज झाले आहेत. श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करा आणि विसर्जनाच्या वेळी कुठेही फेकून द्या, असा अजब कारभार प्रशासनाकडून केला जात असल्याचेही खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.

कोरोनाची साथ मागील पाच महिन्यांपूर्वी आलेली आहे. त्यामुळे आयुक्तांनी गणेशोत्सवाबाबत निर्णय घेताना सारासार विचार करणे गरजेचे होते. महापालिकेकडून प्रभाग कार्यालय स्तरावर विसर्जन हौद निर्माण करून तसेच फिरते विसर्जन हौद तयार करून पालिकेने घरगुती गणेश विसर्जनाची तयारी करणे अपेक्षित होते. शहरातील गणेश विसर्जन घाटांवर प्रशासनाने पत्रे लावले आहेत. पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त दोघेच निर्णय घेतात. त्याची लोकप्रतिनिधींना कानोकान खबरही दिली जात नाही. शेजारी पुणे महापालिकेने विसर्जन घाटाची सोय केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला आहे, असे म्हणत खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.