Pimpri News: अठरा वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस द्या; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाने महाराष्ट्र राज्य सर्वाधिक प्रभावित आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकार मोठे प्रयत्न करत आहे. राज्याला कोरोना लसीचे जास्तीत जास्त डोस देण्यात यावेत. राज्यातील अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. 18 वर्षांपुढील सर्वांना लस दिल्यास निश्चितपणे महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असेही ते म्हणाले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत शून्य काळ सत्रात पुणे जिल्ह्यातील, राज्यातील कोरोना रुग्णवाढीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधत वय वर्ष अठराच्यावर असलेल्या सर्व लोकांना लस देण्याबाबत केंद्र शासनाकडे विनंती केली.

खासदार बारणे म्हणाले, देशभरात महाराष्ट्र राज्य कोरोनाने सर्वाधिक प्रभावित आहे. महाराष्ट्रात एका दिवसात 25 हजार आठशे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसापूर्वी केंद्र सरकार सोबत चर्चा केली. कोरोना लसीचे जास्तीत- जास्त डोस देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने 71 देशांना सहा हजार कोटी कोरोना लसीचे डोस दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य कोरोनाने सर्वाधिक प्रभावित आहे. मी पुणे जिल्ह्यातून येतो. माझ्या मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण या भागात एक कोटी लोकसंख्या आहे. केंद्र सरकारने पंचेचाळीस वर्षापुढील नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यात 45 वर्षांपुढील नागरिकांची संख्या 73 लाख आहे.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जास्तीत जास्त कोरोना लसीचे डोस मिळाले तर निश्चितपणे महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रभाव कमी होईल. राज्यातील अठरा वर्षांपुढील सर्व लोकांना कोरोनाची लस दिली तर महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रभाव कमी होईल,  असे खासदार बारणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.