Pimpri News: लसीकरण @12,03660! कोरोना प्रतिबंध लसीकरणाचा 12 लाखाचा टप्पा पूर्ण

30 टक्के नागरिकांनी घेतले दोनही डोस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व खासगी केंद्रांच्या माध्यमातून शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. आज (शुक्रवारी) लसीकरणाचा बारा लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. आजपर्यंत 12 लाख 3 हजार 660 जणांनी लस घेतली आहे. त्यात 8 लाख 88 हजार 555 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, 3 लाख 15 हजार 105 नागरिकांचा दुसराही डोस झाला आहे. दोनही डोस घेतलेल्या नागरिकांचे सरासरी प्रमाण 30 टक्के आहे.

कोरोनावर सध्या कोणतेही औषध नसून प्रतिबंधात्मक लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे महापालिकेने केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीकरणावर भर दिला आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू केले आहे. सुरुवातीला आरोग्य अधिकारी, कर्मचारी व फ्रंट लाइन वर्कर यांना प्राधान्य देण्यात आले. मात्र, लस घेणे ऐच्छिक होते. त्यानंतर सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस सक्तीची करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वांनाच ती दिल्या जाऊ लागली. मात्र, कोविन ॲपवर नोंदणी आवश्‍यक होती.

सद्यःस्थितीत कोविन ॲपवर ऑनलाइन नोंदणी, ऑन दि स्पॉट नोंदणी, किऑक्स यंत्राद्वारे टोकन घेऊन नोंदणी अशा पद्धतीने लसीकरण केले जात आहे. त्यातही 18 ते 44 व 45 पेक्षा अधिक वयोगट आणि पहिला डोस व दुसरा डोस अशा पद्धतीने नियोजन केले आहे. विदेशात जाणारे विद्यार्थी व गरोदर महिलांसाठी काही केंद्रांवर डोस राखीव ठेवले जात आहे. तसेच, दिव्यांग व्यक्ती व तृतीयपंथीयांना प्राधान्य दिले जात आहे.

शहरात 23 मार्चपर्यंत लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण झाला होता. एप्रिलमध्ये दोन लाख डोस देण्यात आले. मे महिन्यात एक लाख, जूनमध्ये दोन लाख आणि जुलै महिन्यात चार लाख डोस देण्यात आले. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन लस महापालिकेच्या केंद्रावर दिली जात आहे. खासगी केंद्रांवर मात्र, या दोन्ही लशींसह स्फूटनिक व्ही लसही उपलब्ध आहे. महापालिकेच्या केंद्रांवर मोफत तर, खासगी केंद्रांवर शुल्क आकारून लसीकरण सुरू आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, ‘’केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार, शहरात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. त्यासाठी महापालिकेच्या 69 व खासगी 132 केंद्रांवर व्यवस्था केली आहे. आतापर्यंत 12 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी अंदाजे 30 टक्के नागरिकांचे दोनही डोस झाले आहेत. सर्वांनी दोनही डोस घेणे आवश्यक आहे. 60 वर्षांपुढील, दुर्धर आजार असलेल्या नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेनुसार प्राधान्याने दुसराही डोस घ्यावा’’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.