Pimpri News:  लसीकरण केंद्रे एक दिवसाआड पूर्ण क्षमतेने सुरू ठेवा – प्रशांत शितोळे

एमपीसी न्यूज – लसीची कमतरता, नियोजनाचा अभाव यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लसीअभावी परत जावे लागते. त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. त्यासाठी शहरातील लसीकरण केंद्रे एक दिवसाआड पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केली आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात प्रशांत शितोळे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात गेली दोन महिने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण चालू आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची व्यवस्था केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात समन्वय नसल्यामुळे पूर्णपणे बिघडलेली आहे असे चित्र आहे. त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत.

महापालिकेने जवळपास 90 ठिकाणी लसीकरण केंद्र केली. परंतु, या केंद्रांमध्ये लसीकरण चालू झाल्यापासून ते आजपर्यंत किती लसीकरण झाले ? यासाठी किती मनुष्यबळ लागले ? किती दिवस बिना लसीकरणाचे गेले?  याचा विचार केला तर तुटपुंजा आकडा समोर येतो.

सुरुवातीला लसीकरण करून घेण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक केंद्रांवर गर्दी करत आहेत. त्यातच केंद्र सरकारने प्रत्येक नागरिकास लस मिळेल यासाठी cowin वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यास सांगितले. परंतु, लस उपलब्धता करून दिली नाही. त्यामुळे अनेक लोक आज लसीकरणापासून वंचित राहत आहेत. तर, अनेक जण पहिला डोस मिळाल्यानंतर दुसरा डोस मिळत नाही म्हणून वंचित राहत आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र शासन काय करेल ते करेल परंतु महापालिका सत्ताधाऱ्यांनी व प्रशासन यांनी सुद्धा उपलब्ध असलेल्या सेवा -साधनांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

यासाठी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील केंद्र एक दिवसाआड चालू राहतील. त्यावेळी लस  पुरेल असे नियोजन करणे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर किमान दोनशे नागरिकांचे लसीकरण होईल अशी व्यवस्था करणे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. कारण सुरुवातीला ज्येष्ठांचे लसीकरण होते त्या ज्येष्ठ नागरिकांना  प्राधान्य द्यावे. लसींची उपलब्धता लवकरात लवकर व्हावी. यासाठी गरज पडल्यास केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन यांच्याकडून खरेदी घेणे बाबत निर्णय घेणे.

कोरोना तिसरी लाट येईल अशा शक्यता असल्याने जास्तीत जास्त नागरिक प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतील असे नियोजन करणे. वॅक्सिन टास्क  (Vaccination Task )मानून त्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर द्यावी.   लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य घ्यावे असेही शितोळे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.