Pimpri vaccination News: 1 लाख 20 हजार नागरिकांचे लसीकरण ; ‘कोव्हिशील्ड’चे 63 हजार, ‘कोव्हॅक्सिन’चे 990 डोस शिल्लक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर, वय वर्ष 60 व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असलेल्या 1 लाख 20 हजार 492 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला, तर त्यातील 14 हजार 987 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसी घेणा-यांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण जास्त आहे. सध्या महापालिकेकडे ‘कोव्हिशील्ड’चे 62 हजार 876, तर ‘कोव्हॅक्सिन’चे 990 डोस डोस शिल्लक आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांना, फ्रंटर वर्कर यांना लस देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे.

कोरोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. आरोग्य सेवकांमध्ये 20 हजार 924 जणांनी पहिला, तर 10 हजार 216 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फंटलाईन वर्करमध्ये 16 हजार 404 जणांनी पहिला, तर 4621 जणांनी दुसरा डोस घेतला. वय वर्ष 60 व त्यापुढील ज्येष्ठ नागरिकांमध्ये 68 हजार 837 जणांनी पहिला डोस घेतला आहे. त्यातील 117 जणांनी दुसराही डोस घेतला.

वय वर्ष 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असलेल्या 14 हजार 327 जणांनी पहिला डोस घेतला असून त्यातील 33 जणांनी दुसराही डोस घेतला आहे. अशा एकूण 1 लाख 20 हजार 492 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, 14 हजार 987 जणांनी लसीचा दुसराही डोस घेतला आहे.

सरकारच्या आदेशानुसार आजपासून 45 वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 45 वर्ष आणि त्यापुढील नागरिकांची लोकसंख्या 4 लाख 57 हजार 500 आहे. आजअखेर 1273 कोविड 19 सत्र कार्यान्वित आहेत.

महापालिकेकडे ‘कोव्हिशील्ड’चे 62 हजार 876, तर ‘कोव्हॅक्सिन’चे 990 डोस शिल्लक

पिंपरी-चिंचवड महापालिकेला लसीकरणासाठी आजपर्यंत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या ‘कोव्हिशील्ड’चे 1 लाख 93 हजार 100 डोस मिळाले. भारत बायोटेकने बनविलेल्या ‘कोव्हॅक्सिन’चे 12 हजार असे एकूण 2 लाख 5 हजार 100 डोस प्राप्त झाले आहेत. सध्या ‘कोव्हिशील्ड’चे 62 हजार 876 आणि ‘कोव्हॅक्सिन’चे 990 डोसेस शिल्लक आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.