Pimpri News : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस शनिवारी (दि.12) साजरा होत आहे. या निमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने 12 ते 14 डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले, दरवर्षी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा तसेच, विविध शैक्षणिक उपक्रम घेतले जातात.

यावर्षी कोविड-19 मुळे क्रीडा स्पर्धा व काही शैक्षणिक उपक्रम प्रत्यक्षात घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्या गुणवत्तावाढीसाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेने 12 ते 14 डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रम आयोजित केले आहेत.

यामध्ये ई – कन्टेन्ट डेव्हलपमेंट, रोबोटिक्स मॉडल मेकिंग स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, संशोधन अविष्कार, राज्यस्तरीय एकांकिका व काव्यलेखन स्पर्धा, शरद पवार यांना शुभेच्छा पत्र लेखन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, नादमधुर कविता स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यासोबतच 80 व्या वाढदिवसानिमित्त 80 हजार सूर्यनमस्कार पुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. तज्ञ मान्यवरांची ऑनलाइन ‘शारदा व्याख्यानमाला’ देखील आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते होणार असून, समारोपासाठी साता-याचे खासदार श्रीनिवास पाटील व राज्यसभा खासदार वंदना चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

शारदा व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद’च्या संचालक डॉ. तनुजा नेसरी यांचे ‘रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेद’ या विषयावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत वेबिनार होणार आहे.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) चे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. विवेक सावंत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. राम ताकवले, जन आरोग्य अभियानचे प्रमुख डाॅ. अनंत फडके, पक्षीमित्र किरण पुरंदरे आदि दिग्गज मान्यवर शारदा व्याख्यानमालेत मार्गदर्शन करणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम पार पडणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहन देशमुख, उपसचिव लक्ष्मण पवार, सहसचिव आत्माराम जाधव यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.