Pimpri News: चार राज्यातील विजयाची पिंपरी-चिंचवडमध्ये होणार पुनरावृत्ती – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’या संकल्पनेला देशातील सर्वसामान्य नागरिकांनी साथ दिली. त्यामुळे भाजपाचा झेंडा सर्व राज्यांत फडकत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. निवडणुकांतील विजयाची पिंपरी-चिंचवडमध्ये पुनरावृत्ती होईल असा दावाही त्यांनी केला.

उत्तरप्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. पंजाबमध्ये जनतेने काँग्रेसला नाकारल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी, तर उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. या चारही राज्यात भाजपाला मोठी आघाडी मिळाली आहे. विकासाचे मुद्दे घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. त्याला सामान्य नागरिकांची साथ मिळत आहेत. लोकांना विकास आणि विश्वास हवा आहे. भाजपा धोरणानुसार आश्वासक विकास हाच निवडणुकांचा मुद्दा आहे. भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून देश भाजपामय होतोय, याचे समाधान वाटते, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडची निवडणूक विकासाच्या मुद्यांवरच लढणार…

राज्यात भाजपामय वातावरण होत आहे. लोकांना विकासकामांवर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यात रोल मॉडेल ठरतील, असे प्रकल्प उभारले आहेत. आता देशातील निवडणुकांचा कल पाहता आणि गोव्यातील अत्यंत चुरशीची लढत लक्षात घेता सर्वसामान्य नागरिक भाजपाच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवताना दिसतात. पिंपरी-चिंचवडमध्येसुद्धा या निवडणुकांच्या निकालांचा सकारात्मक परिणाम दिसेल. आम्ही महापालिका निवडणुका केवळ विकासाच्या मुद्यांवरच लढवणार आहोत, असेही  आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.