Pimpri News: सायन्सपार्क, ॲटो क्लस्टरची निर्मिती अन् सांस्कृतिक चळवळ रुजविणारे अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांची स्वेच्छानिवृत्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सायन्स पार्कची निर्मिती करुन विज्ञान क्षेत्रात शहराचे नाव उंचाविणारे, ऑटो क्लस्टरच्या निर्मितीत योगदान देणारे आणि शहरात सांस्कृतिक चळवळ रुजविणारे महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त तथा विद्युत विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत तुपे यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

प्रवीण तुपे 1983 मध्ये  महापालिका सेवेत रुजू होऊन त्यांनी अतिरिक्त आयुक्तपदावर मजल मारली. वैद्यकीय कारणामुळे तुपे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. 31 डिसेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्या कारकिर्दीतील कामाचा आढावा घेतला.

प्रवीण तुपे यांनी जेएनएनआरयुएम, बीआरटीएस, सौर ऊर्जा वीज निर्मिती यांसाख्या प्रकल्पांतर्गत विद्युत विषयक कामे व विद्युत आणि कार्यशाळा विभागाचे संपूर्ण कामकाज विभाग प्रमुख म्हणून समर्थपणे संभाळले आहे. त्यांनी तीन वर्ष पाणीपुरवठा विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यामध्ये त्यांनी पाणी मीटर बसविण्यात आग्रही भूमिका, पाणीदर ठरविणे, स्काडा प्रणाली, संगणकीय पाणी बील प्रथमच सुरु केले.

JNNRUM मध्ये SLB (Service Level Benchmarking) चे समन्वयक म्हणून काम केले आहे. (SLB मध्ये पाणीपुरवठा, जलनिःस्सारण, आरोग्य, स्टॉर्म वॉटर इ. चा समावेश आहे.) पिंपरी- चिंचवड सायन्स पार्क सन 2013 मध्ये चिंचवड येथे निर्माण करुन समर्थपणे कार्यान्वित केले आहे.

आत्तापर्यंत सायन्स पार्कला 20,42,000 विद्यार्थी व प्रेक्षकांनी भेट दिलेली आहे. विज्ञान क्षेत्रात पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कचे नांव संपूर्ण भारतात आदराने घेतले जाण्याचे श्रेय त्यांना जाते. सायन्स पार्क येथे दर महिन्याच्या 1 तारखेस मोफत विज्ञान व्याख्यानांचे आयोजन व वेळोवेळी आकाश दर्शनाचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.

सायन्स पार्कचे ते संस्थापक संचालक व ऑटो क्लस्टरचे संचालक देखील आहेत. त्यांनी ऑटो क्लस्टर येथे सन 2016-17 मध्ये व्यवस्थापकीय संचालक (M.D.) पद एक वर्ष रिक्त असताना उपलब्ध असलेल्या कर्मचा-यांमध्ये यशस्वीरीत्या काम चालू ठेवले.

ऑटो क्लस्टर येथे नवीन व तरुण उद्योजकांना स्टार्टअप मधे प्रोत्साहन देणेसाठी Incubation Hub ची निर्मिती केली. पुणे विद्यापीठ यांच्याशी सामंजस्य करारामधे सहभाग घेतलेला आहे. ऑटो क्लस्टरचा उपयोग लघु व मध्यम उद्योजकांना होणेस पुढाघार घेतलेला आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड येथे 150 आसन व्यवस्था असलेले ‘तारांगण’ बांधणी कामकाजात पुढाकार घेऊन ‘तारांगण’ बांधणीचे कामकाज पूर्णत्वास आणले. त्यांच्यामार्फत महापालिका विद्युत विभागांतर्गत ऊर्जा बचतीकरीता सातत्याने विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

यामध्ये पारंपरिक दिव्यांऐवजी LED दिव्यांचा वापर, रस्त्यांवरील दिवाबत्तीचे आवश्यकतेनूसार रीअल टाईम क्लॉकचा वापर करुन डीमिंग करणे, विविध उच्चदाब ग्राहक इमारतींमध्ये मोशन सेंन्सर्सचा वापर करणे, उच्चदाब ग्राहक वाहिन्यांमध्ये मायक्रोकंट्रोलर बेस्ड पॉवर फॅक्टर पॅनलचा वापर करुन युनिटी पॉवर फॅक्टर राखणे. त्यायोगे वीजबीलामध्ये मोठ्या प्रमाणावर पॉवर फॅक्टर इंसेटिव्ह मिळवणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करुन ऊर्जा संवर्धन करण्याकरीता सुमारे 1 MW ( Mega Watt ) सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. नाशिक फाटा येथील उड्डाणपूलास आकर्षक रंगीत प्रकाश योजना केली आहे. आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचा समावेश असलेल्या शास्त्रीय, सुगम संगीत व लोकसंगीतावर आधारीत स्वरसागर संगीत महोत्सवाचे ते सलग 21 वर्षे मुख्य संयोजक आहेत.

तुपे यांनी महापालिकेचे सांस्कृतिक कला धोरण तयार केले व त्याची सुरुवात केली. चिंचवड येथे महाराष्ट्र लोककला संगीत महोत्सव आयोजित केला. तसेच मॅरेथॉन स्पर्धेचेही आयोजन केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, बाल चित्रपट महोत्सव व प्रभात चित्रपट महोत्सवाबरोबरच कवी संमेलन, हास्य कवी, हिंदी हास्य कवी संमेलन व मुशाहीरा यांचे शहरात आयोजन केले आहे.

राष्ट्रीय एकात्मतेवर आधारीत पिंपरी-चिंचवड महोत्सवाचे सुमारे 10 वर्षे पश्चिम विभाग सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने मुख्य समन्वयक म्हणू काम केले आहे. महापालिकेची संगीत अकादमी अद्ययावत करण्यासाठी महेश काळे अकादमी बरोबर करार करण्यासाठी प्रयत्न केला. तसेच मराठी भाषा संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड शाखेच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतलेला आहे.

महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना औद्योगिक ज्ञान मिळणेसाठी आयटीआय व कंपनी या दोन्ही ठिकाणी शिक्षण (Duel System Training) मिळण्याकरीता मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज व इतर उद्योजक यांच्या बैठका घेऊन Duel System Training राबविण्यासाठी पुढाकार घेतला.

मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या विस्तारासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा शेजारील जागा व अभिलेख कक्षाकरीता सेक्टर 26 येथे स्वतंत्र जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच कोविड 19 कालावधीत ऑटो क्लस्टर येथे 15 दिवसांत रुग्णालय उभारण्यात विशेष पुढाकार घेतला. कोविड कालावधीत उद्योगनगरीमधे उद्योगांना / कामगारांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ऊर्जा बचतीकरता रस्त्यांवरील अपारंपारीक दिव्यांऐवजी LED दिवे बसविणे. याकरीता निर्णयामध्ये EESL या केंद्र शासनाच्या कंपनी मार्फत LED दिवे बदलण्यासाठी शासनाद्वारे करारनाम्याचा मानक मसुदा निश्चित करण्यात आला होता. या मसुद्यामध्ये अथक प्रयत्नांनी महापालिकेच्या हिताचा विचार करुन काही बदल करण्यात आले. त्यास शासनाची पुनश्च मान्यता घेण्यात आली. याद्वारे महापालिकेचे साधारणतः 30 कोटी इतकी आर्थिक बचत होणार आहे. तसेच वेळोवेळी पंपींग मशनरी व इतर विद्युत विषयक कामांमध्ये वीज बचत केली आहे.

औंध -रावेत रस्त्यावरील स्व. राजीव गांधी पूल ते डांगे चौकापर्यंत महापारेषणची अति उच्चदाब 132 KVA ची वाहिनी हलविणे. या कामासाठी महापारेषण विभागाने 71 कोटीचे अंदाजपत्रक सादर केले होते. परंतू, सदरची केबल भुमीगत न करता रस्त्याच्या दुभाजकामध्ये उंच टॉवरलाईन सूचवून सदरचे काम फक्त 1.25 कोटी मध्ये करुन पालिकेच्या 69 कोटी इतक्या रकमेची बचत केली आहे.

महापालिकेच्या स्थापत्य व विद्युत विभागामार्फत एकत्रित निविदा न काढता विद्युत विभागाकडून सन 2018-19 या आर्थिक वर्षात स्वतंत्र निविदा काढून सुमारे 10 कोटीची बचत केली आहे. एकूण 15 ठिकाणी झोपडपट्टी निर्मुलन (SRA) प्रकल्पाचे काम प्रस्तवित होते. या कामाच्या निविदामध्ये आर्किटेक्ट / कंसलन्टंट मार्फत Indoor Substation चा समावेश करण्यात आला होता.

त्याऐवजी Outdoor Transformer Substation उभारणीकेल्यामुळे Indoor LT panel, Indoor RMU व स्थापत्य विषयक कामे कमी झाल्यामुळे या कामात सुमारे 5.34 कोटी इतक्या रकमेची बचत झालेली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या पाहता पिंपरी-चिंचवडचे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस सहाय्यक, पोलीस निरीक्षक, आरटीओ, पीएमपीएमएलचे प्रतिनिधी तसेच महापालिका स्थापत्य, BRTS, अतिक्रमण विभाग यांच्या समन्वय समितीच्या बैठकी आयोजित केल्या आहेत.

शहरातील कचरा वाहतुकीचा ( Transportation ) खर्च कमी करण्यासाठी त्यांनी गवळीमाथा, एम.आय.डी.सी. भोसरी येथे पहिले कचरा स्थानांतरण केंद्र विकसीत केले. वाहन दुरुस्ती कार्यशाळेमधे उपलब्ध असलेल्या कर्मचा-यांमधेच सेमी प्रायव्हेटायझेशनद्वारे वाहन दुरुस्तीचे कामकाज पद्धत अवलंबली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नुतनीकरणाचे काम पाच महिन्यात पूर्ण करण्यात तुपे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. तसेच तेथे रंगीत तालीम व आर्ट गॅलरीची सोय केली. सन 2012-13 या कालावधीत महापालिका परिसरात उद्यान विभागाकडून करण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेच्या कामकाजात पुढाकार घेऊन 1, 00,000 वृक्ष लागवडीच्या कामात त्यांनी उद्यान विभागाचे कामकाज पाहिले आहे.

अशा प्रकारे प्रवीण तुपे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तांत्रिक, सामाजिक, सांस्कृतिक बांधिलकी जपत पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोलाचा हातभार लावलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.